तर राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे राहतील, प्रकाश आंबेडकर यांचं धक्कादायक विधान; असं का म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक लढ्यात सहभाग नाही. जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. 2024 हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड आहे, असं सांगतानाच उद्या जर मोदींनी राहुल गांधींना माझ्यामागे उभे राहा असं सांगितलं तर राहुल गांधी त्यांच्यामागे उभे राहतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक येथील बौद्ध महासभेच्या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
राहुल गांधी तुम्ही माझ्या मागे उभे राहा. नाही तर तुरुंगाच टाकेल, असं मोदींनी राहुल गांधी यांना म्हटलं तर उद्या राहुल गांधी मोदींच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे, माझ्या मागे उभे रहा, नाहीतर जेलमध्ये जा, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. इथले लढे राजकीय लोकं लढतील, असं समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
2024 हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल. तुम्ही 2024 ला सत्ता बदलाय. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी असतील. 2024 ला मोदी विरोधी बाकावर जातील यासाठी आताच कामाला लागा. आम्ही मोहन भागवत यांना विचारतो की, तुम्हाला शस्त्र बाळगायचा परवाना आहे का? असेल तर दाखवा. यांना शस्त्र बाळगायचा अधिकार आहे का? 2024 मध्ये एकतर आपण तरी हारू, नाहीतर ते तरी हारतील, असंही ते म्हणाले.
चीनच्या घुसखोरीवरूनही आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली. 56 इंचाची छाती चीनमध्ये 14 इंचाची होते. संसदेच्या सभागृहात आणखी काही माणसं शिल्लक आहेत. ते मोदींना चॅलेंज करत आहेत. पण मोदी चीन विरुद्धच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही. मोदी आणि चीनचं काय प्रेम आहे, माहीत नाही?, असा टोला त्यांनी लगावला.
दुर्दैवाने इथले वर्तमानपत्र आणि त्यांचे मालक हे सुद्धा राजकीय नेत्यांसारखे झाले आहे. ते या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत. आम्ही 20 देशांचे नेते झाले याबद्दल मोदींचे अभिनंदन केले होते. पण अध्यक्ष केले म्हणून भारतातील बाजारपेठ विकू नका, हीच अपेक्षा आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक लढ्यात सहभाग नाही. जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.