मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत
मुंबई-आग्रा महामार्गांवर आसनगावजवळ झालेल्या ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही.
शैलेश पुरोहित, इगतपुरीः मुंबई-आग्रा महामार्गांवर (Mumbai-Agra highway) आसनगावजवळ झालेल्या ट्रक (Truck) आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, हॉटेल परिवारच्या समोर पहाटे 3 वाजता मालवाहतूक करणारा ट्रक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन धडकला. त्यानंतर तो महामार्गावर येऊन पलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. तसेच चेरपोली गावाजवळ एक मालवाहतूक ट्रेलर (trailer) पलटी झाला. या दोन्ही अपघातात जीवित हानी झाली नाही, परंतु मुंबईकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे. त्याचा वाहन चालकांना तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे पोल काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दोन दिवसांत अपघात…
मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरने उभ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेला हा दुसरा अपघात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एक तर चालक अतिवेगात वाहने चालवतात किंवा अनेकांनी मद्यप्राशन केलेले असते. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि असे अपघात होतायत.
तर अपघात टळतील
कुठेही होणारे बहुतांश अपघात सहज टाळता येतात. मात्र, त्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. वेग मर्यादेत असेल, तर प्रवास सहज आणि सुकर होतो. शिवाय आपण कोणाच्या मृत्यूला वा जखमी होण्याला कारणीभूत होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने सजग रहायला हवे. शक्य तितके अपघात टाळायला हवेत.
दुचाकी अपघात वाढले
नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.