विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना नाशिकमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली बघायला मिळाली. काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या दोन गटांनी एकाच बॅनरच्या सहाय्याने दोन वेगवेगळ्या वेळेत आंदोलनं केली. या आंदोलनांची शहरात चांगलीच चर्चा सुरु आहे.

काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडींमुळे राज्यातील जनतेने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटावर असणारी नाराजी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिली. यानंतर आता राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी जास्त महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधित जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला यावेळी चांगली संधी आहे. असं असताना नाशिकमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पक्षात कुरबुरी असणे किंवा मतभेद असणं हे साहजिक आहे. तसं असू शकतं. विचार पटले नाहीत तर काही वेळाला मनभेद होतात. पण आपण शेवटी एकाच पक्षाचे आहोत ही भावना प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मनात जागृत राहायला हवं. पण नाशिकमध्ये आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला. पक्षातील अंतर्गत वाद किंवा मनभेद थेट चव्हाट्यावर येताना दिसले.
नेमकं काय घडलं?
नाशिक काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. विशेष म्हणजे अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसवर दोन आंदोलन करण्याची वेळ आली. नाशिकच्या एमजी रोड परिसरात असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयात आज काँग्रेसच्या वतीने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत यांच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसकडून पक्ष कार्यालया बाहेर एकाच बॅनरवर वेगवेगळ्या वेळी दोन आंदोलन करण्यात आली.
आंदोलनामागील नेमकं कारण काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनगणनेवर भाषण केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलताना जातीचा उल्लेख केला. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात आंदोलनाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमधील एका दुसऱ्या गटाने 15 मिनिटांच्या अंतराने आंदोलन केलं. एकाच बॅनरवर पक्षाच्या कार्यालयाबाहेर दोन आंदोलन यावेळी पहावयास मिळाले. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
15 मिनिटांच्या अंतरानंतर दुसऱ्या गटाचं आंदोलन
दरम्यान, काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष विविध पदांवरील पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच बॅनरवर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने काँग्रेस कार्यालयाबाहेर उभे राहून भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. पहिल्या वेळी झालेल्या आंदोलनात प्रसारमाध्यमांसमोर येण्यासाठी जागा नसल्याने आणि बोलता येत नसल्याने काँग्रेसच्या एका गटाने 15 मिनिटांच्या अंतरानंतर आंदोलन केलं.
या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकमधील शहर काँग्रेसच्या गटबाजीची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने नाशिकमधील काँग्रेसच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गटबाजी चर्चेत आली होती. तत्कालीन जिल्हाध्यक्षांना राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचे गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.