हे कसले पोलादी पुरुष? हे तर तकलादू पुरूष; उद्धव ठाकरे यांचा मणिपूरवरून केंद्रावर हल्लाबोल
सरदार पटेलांनी या देशाच्या दुश्मनाला गुडघे टेकायला लावले. निजामाला गुडघे टेकायला लावले. आमच्या अंगावर याल तर तलवारीला तलवार भिडेल असं सरदार पटेल म्हणाले. ते तेव्हाच्या भाजपविषयी म्हणजे संघाविषयी बोलले आहेत, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात फौजा घुसवल्या आणि मराठवाडा महाराष्ट्रात समील करून घेतला होता. आज आपण त्यांचे पुतळे उभारतोय. कारण ते खरे पोलादी पुरुष होते. वल्लभभाईंनी मराठवाड्यात जशी कारवाी केली. तशी मणिपूरममध्ये कारवाई करायची यांची हिंमत होत नाही. हे स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेत आहेत. हे कसले पोलादी पुरूष? हे तर तकलादू पुरूष आहेत. यांच्या कारभाराचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा जोरदार हल्लाबोल केला आहे. पुतळा कुणाचाही उभा करता येतो. पण सरदार वल्लभभाई पटेल हे नुसते नावाचे पोलादी पुरुष नव्हते. तर कामाचे पोलादी पुरुष होते. पण आज कोणीही उठतो आणि स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेतो. पण काम करून उभं राहणारे काही तुरळक लोक आहेत. त्यापैकी पटेल एक आहेत. त्यांचा पुतळा पालिकेच्या आवारात उभारला हे महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कामाची उंची कधी गाठणार?
संजय राऊत यांनी वल्लभभाई यांचं एक वाक्य सांगितलं. ते कोणाला उद्देशून होतं तेही सांगितलं. सरदार पटेलांनी त्याकाळात संघावर बंदी आणली होती. त्यांना स्वातंत्र्य प्रेम काय हे माहीत होतं. तुम्ही इथे पटेलांचा पुतळा उभारला. त्याची उंची किती माहीत नाही. काहींनी मोठा पुतळा उभारला. पुतळ्याची उंची ठिक आहे. कामाची उंची कधी गाठणार? वल्लभभाईंनी जे काम केलं ती उंची गाठा ना?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला.
केंद्र सरकार हलतंय
उद्धव ठकारे स्टेजवर उभे राहताच स्टेज हलू लागला. त्याचा संदर्भ घेत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. मी उभा राहिलो पण स्टेज हलतोय. मी विचार केला स्टेज कसं हलतंय? एकूणच केंद्र सरकार डगमगायला लागलं. त्याचं हे प्रतिक आहे. केंद्र सरकार हलत आहे, असं ते म्हणाले.
इंडियाची अलर्जी
यावेळी त्यांनी भारत या शब्दावरून भाजपवर टीका केली. आज भारत बोललं पाहिजे. कारण इंडियाची काही लोकांना अलर्जी आहे. इंडिया बोलल्यावर काहींना खाज सुटायला लागली. आपण इंडिया म्हटल्यावर खाज सुटली. नाही तर व्होट फॉर इंडिया म्हणायचे, असा चिमटाही त्यांनी काढला.