उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत गेल्याचा पश्चात्ताप?; नाशिकच्या मेळाव्यातून सर्वात मोठं विधान काय?
प्रभू रामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे तरी कळू द्या. एक तरी गुण. प्रभू रामचंद्र एकवचनी होते. सत्य वचनी होते. ज्या शिवसेनेने तुम्हाला ज्या गादीपर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेला दिलेलं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकता? आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल. कारण त्यांनी शिवसेना पळवली. भगव्याशी प्रतारणा केली. त्यांचा कोणीही वाली असेल त्यांचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपसोबत युती केल्याचा पश्चात्ताप झाल्याचं विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आरती केली. आज त्यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपच नव्हे तर संघावरही घणाघाती हल्ला चढवला. संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांनी आधी आपली जन्म कुंडली मांडावी. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर मलाही थोडा पश्चात्ताप होतोय. त्यावेळी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आणि आपण एकत्र आलो. पण हे लोक भगव्यात भेद करणारे निघाले. त्यांनी विचारांची वाताहत केली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपमय झालो नाही, काँग्रेसमय कसे होणार?
त्या मुलुंडच्या तोतल्यासारखं यांना जनतेच्या न्यायलयात उभं करायचं आहे. राज्याला आणि देशाला टिकवायचं आहे. महाराष्ट्रावर चालून आले त्यांना गाडण्याचा इतिहास लिहायचा आहे. आमच्यावर आरोप होतो की, आम्ही काँग्रेससोबत गेलो. काँग्रेसमय झालो. आम्ही 30 वर्ष भाजपसोबत जाऊन निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले कसे होऊ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
त्यांना माहीत होतं…
मुंबईत दंगल पेटली तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी गावागावात जाऊन संरक्षण केलं. श्रीकृष्ण अहवाल आम्ही कचऱ्यात टाकला होता. अटल बिहारी वाजपेंयींनी अहवाल स्वीकारायला सांगितला. नितीमत्तेवर बोलले.. ऐसा नही करना चाहीए, असं आम्हाला वाजपेयी म्हणाले. त्यानंतर आम्ही श्रीकृष्ण अहवाल घेतला. गीता म्हणून त्या अहवालाची पूजा केली. कारण वाजपेयींना माहीत होतं, यात भाजपवाले सापडणार नाहीत. फक्त शिवसैनिक सापडतील, अशी टीका त्यांनी केली.
मोदी जगभर फिरले, अयोध्येला गेले नाही
आता म्हणे यांना समर्थ देश निर्माण करायचा आहे. मग दहा वर्ष अंडी उबवत होता का? पहिल्या पाच वर्षात पंतप्रधान जगभर फिरत होते, पण अयोध्येला गेले नाही. लक्षद्वीपला गेले, मणिपूरला तर नाहीच गेले. म्हणून म्हटलं संध्याकाळी बाकीचे विषय बोलणार आहे. कामगार बेकार होत आहे. सर्वांनी नुसतं राम राम करायचं का? असा सवालही त्यांनी केला.