25 वर्षात शिवसेनीची भाजप झाली नाही, मग काँग्रेस कशी होणार?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल
मधल्या काळात वल्लभभाईंचा उंच पुतळा उभारण्यात आला. हे सर्व चाळे चाललेत ना लक्षात घ्या. भाजपने किंवा संघाने कधीच आदर्श व्यक्तीमत्त्व उभे केले नाहीत,असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.
जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाने काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटावर वारंवार टीका केली आहे. शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे, असं शिंदे गट आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या टीकेचा आज समाचार घेतला आहे. आम्ही भाजपशी 25 वर्ष युती केली. या काळात आम्ही शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही, तर काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते जळगाव येथील जाहीरसभेतून बोलत होते.
इंडिया आघाडीची बैठक झाली. माझा पक्ष चोरला. नाव चोरलं. तरीही उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीत किंमत होती. ते तुमच्यामुळेच झालं. या बैठकीच्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी पोस्टर लावली गेली. खरंय. बाळासाहेब तसे म्हणाले होते. पण जशी भाजपसोबत 25 वर्ष राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. मग शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत बसला. मुफ्तीसोबत जाऊन भाजपचा पीडीपी झाला होता का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मी कमळाबाईची पालखी वाहणार नाही. त्यासाठी शिवसेना स्थापन झाली नाही. भाजपला कमळाबाई बोलतो. कारण शिवसेना तीच आहे याचा पुरावा देण्यासाठीच कमळाबाई म्हणतो. यापुढेही म्हणेल, असंही ते म्हणाले.
तुमचा नि:पात केल्याशिवाय राहणार नाही
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. तसंच त्यांनी तुम्ही देश सांभाळा. आम्ही महाराष्ट्र सांभाळू. पण त्यांना महाराष्ट्रही पाहिजे. जळगाव पाहिजे, औरंगाबादही पाहिजे. तुम्ही शिवसेनेला नख लावलं. तुम्ही आमचा विश्वासघात केला. आता आमच्या धगधगत्या मशालीची आग काय हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा नि:पात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
अरे कशाला जीव घेता?
जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारचा कोणताच अधिकृत माणूस बोलत नाही. एक दाढीवाला दिसतो. तो काय अधिकृत आहे काय? अरे जीव कशाला घेता जरांगे पाटील यांचा? असा सवाल करतानाच पंतप्रधानांना संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यात मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असं आवाहन त्यांनी केलं.
माझे वडीलही चोरले
मधल्या काळात वल्लभभाईंचा उंच पुतळा उभारण्यात आला. हे सर्व चाळे चाललेत ना लक्षात घ्या. भाजपने किंवा संघाने कधीच आदर्श व्यक्तीमत्त्व उभे केले नाहीत. सरदार पटेल चोरले. सुभाषचंद्र बोस चोरले. आता माझे वडील चोरत आहेत. संघाचा स्वातंत्र्याशी काहीच संबंध नव्हता. पण महापुरुष चोरून दहीहंडी करत आहेत. तुम्ही पुतळा बांधा. पण वल्लभभाईंच्या कामाची उंची आहे. तेवढी तुम्हाला जमेल का?