प्राणवायू स्वयंपूर्णतेकडे नाशिकची वाटचाल; 1 हजार एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सुरू
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीय पवार यांच्या हस्ते आज गुरुवारी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
नाशिकः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीय पवार यांच्या हस्ते आज गुरुवारी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
साथरोगांच्या काळात व इतर काळातही जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सतत पुरेसा साठा असावा म्हणून नाशिक जिल्ह्याची वाटचाल ऑक्सिजन स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील एक हजार एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी निफाड उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या लोकार्पणप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे उपस्थित होते.
तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती
तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये ३५० मेट्रिक टनची व्यवस्था केली असून, ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आपण निर्मिती करणार आहोत, अशी माहिती नुकतीच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. त्यांच्या हस्ते घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर ठरली. यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या परिस्थितीत शासन- प्रशासनाने ऑक्सिजनचे यशस्वी नियोजन केले. एरव्ही जिल्ह्यात 80 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून नाशिक जिल्ह्यात सर्व रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 29 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले.
रुग्ण वाढीची भीती
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
इतर बातम्याः
नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!
महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका
नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!https://t.co/QNnUnF8M7k#Nashik|#MunicipalCorporationElection|#WardFormation|#Corporator
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021