आरक्षण आंदोलन पेटलं… रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड; जळगावात रास्ता रोको
विमुक्त जातीत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. त्यासाठी जातीचे खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे. खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर आणि ते घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आज विमुक्त जातातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच अशा प्रकारची घुसखोरी थांबवण्याची मागणीही केली.
किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 6 फेब्रुवारी 2024 : जळगावमध्ये आरक्षण आंदोलन पेटलं आहे. जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने आंदोलन चिघळलं आहे. आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवानी जळगावाच्या पहूर येथे रास्तारोको आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे.
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलं आहे. विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे.
महिलांही आंदोलनात उतरल्या
या आंदोलनात तरुणांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. रास्ता रोको करतानाच जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. राज्य सरकारचा तीव्र निषेधही नोंदवण्यात येत आहे. राज्यात एकीकडे आरक्षणावरून आधीच ओबीसी आणि मराठा समाज आमनेसामने आले असताना आता विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाज सुध्दा रस्त्यावर उतरल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
तर मतदान करणार नाही
विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाज बांधव सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तसेच मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.