नाशिक : नाशिकची पदवीधर निवडणूक (Nashik Padvidhar Election) लक्षवेधी ठरतेय. ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीही (NCP) पाठिंबा देईल, असं चित्र आहे. पण सत्यजित तांबेंवरुन संभ्रम कायम आहे. भाजप पाठिंबा देणार की नाही? हे स्पष्ट नाहीय. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत असली तरी पाठिंब्यावरुन जो सस्पेंस आहे, त्यावरुन मतदार संभ्रमात आहेत. शुभांगी पाटलांना ठाकरे गटानं पाठींबा दिलाय. पण मविआचा पाठींबा अद्याप घोषित झालेला नाही. सत्यजित तांबेही अपक्ष आहेत. त्यांनाही भाजपनं अद्याप पाठिंबा घोषित केलेला नाही. तर शुभांगी पाटलांनी ठाकरे गटाचा पाठींबा मिळवल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु केलेत. शेगावात शुभांगी पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेतली. आणि पाठिंबा देण्याची मागणी केली.
महाविकास आघाडीची बुधवारी बैठक होणार आहे. त्याच बैठकीत शुभांगी पाटलांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही पाठींब्याचा निर्णय होईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
दुसरीकडे 12 तारखेला अपक्ष अर्ज भरल्यानंतर सत्यजित तांबेंनी पुन्हा माध्यमांना विस्तृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं तांबेंचे मतदारही संभ्रमात आहेत.
विशेष म्हणजे एका मतदारानं तर सत्यजित तांबेंना थेट फोन करुन नेमकी भूमिका काय? कोणाचा पाठिंबा घेणार आहात? असं स्पष्टपणे विचारलंय. त्यावर आपण पक्षीय राजकारणापासून दूरच राहणार असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलंय. म्हणजेच, सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, हे तूर्तास त्यांच्या बोलण्यातून क्लिअर झालंय.
18 किंवा 19 तारखेपर्यंत थांबा, असं सत्यजित तांबे म्हणतायत. आणि मतदार यासाठी संभ्रमात आहेत कारण तांबे पिता पुत्रांच्या भाजपच्या पाठींब्यावरुन 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया.
इकडे सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन झालेल्या घोळानं, काँग्रेसमध्येही 2 गट पडल्याचं दिसतंय. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव राहुल दिवेंनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याची मागणी केलीय.
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांनी पटोलेंचा जबाबदार धरत, त्यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडेच पटोलेंची तक्रार केलीय.
सत्यजित तांबेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालीय. दुसरीकडे काँग्रेसनं त्यांच्या डोक्यावरचा हात काढलाय. शुभांगी पाटलांना ठाकरे गटानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. तर सत्यजित तांबेवरुन पुढच्या 24 तासांत चित्र स्पष्ट होईल.