नाशिकः अखेर नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेच्या कामाचा नारळ बुधवारी फुटला आहे. नव्या रचनेत 40 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 प्रभाग 2 सदस्यीय होण्याची शक्यता आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा, असे आदेश मंगळवारी महापालिकेत येऊन धडकले. त्यानुसार या कामाला आज बुधवारपासून (6 ऑक्टोबर) सुरुवात करण्यात आली आहे. आयोगाने राज्यातील एकूण 21 महापालिकांना प्रभाग रचना तयार करायला सांगितली आहे. त्यासाठी कुणाच्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. नाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी. त्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही रचना करताना प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा जास्त केली तरी चालेल. प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी मात्र घ्यावी लागेल.
पंधरा दिवसांत सादर करावा लागेल आराखडा
नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. भाजपच्या या विजयश्रीची विरोधकांनी धास्ती घेतली होती. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसदस्यीय ऐवजी द्विसदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली होती. मात्र, ही निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार प्रभाग रचना सुरू झाली असून पंधरा दिवसांमध्ये हा कच्चा आराखडा निवडणूक विभागाला सादर करावा लागेल. सध्या 29 प्रभाग 4 सदस्यीय आहेत. तर 2 प्रभाग 3 सदस्यीय आहेत. मात्र, नव्या रचनेनुसार आता 40 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 प्रभाग 2 सदस्यीय होण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3
सध्याचे प्रभाग
29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय
अशी राहील नवी प्रभाग रचना?
40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय
इतर बातम्याः
अखेर नाशिकच्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी; ग्रामदेवतेच्या पेड दर्शनाचा निर्णय मागे!
अन् अमरीश पटेलांनी जादूची कांडी फिरवलीच…!
परदेशातल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती; काय आहे पात्रता, कसा करावा अर्ज?
अखेर नाशिकच्या कालिकादेवी मंदिर संस्थानला सुबुद्धी; ग्रामदेवतेच्या पेड दर्शनाचा निर्णय मागे!https://t.co/NPn4q6UrAK#Kalikadevi| #Nashik| #NavratriFestival| #freedarshan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021