आता वाईनचा सुकाळ होणार? किराणा दुकानावरही मिळणार, पहिल्यांदाच टॅक्सची घोषणा, महागणार की स्वस्त होणार?
महाराष्ट्रातली ही इंडस्ट्री अजून तरी तरुण अवस्थेतच आहे. नाशिकमध्ये वाईनयार्ड आहेत. पण तिथं जाऊन किंवा घरी, बारमध्येही वाईनची मागणी करणारे तसे मोजकेच ग्राहक आहेत.
बिअर शॉपी आता महाराष्टात अगदी लहानशा गावातही दिसायला लागल्यात. त्याला कारण आहे ते सरकारनं बदललेलं धोरण. आता त्यात आणखी एका निर्णयाची भर पडलीय आणि तो निर्णय आहे वाईनबद्दलचा. आतापर्यंत फक्त बिअर बार किंवा दारुच्या दुकानात मिळणारी वाईन पुढच्या काळात किराणा दुकानातही विक्रीला उपलब्ध असेल. (Wine Industry Maharashtra) एवढच नाही तर दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या सर्व दुकानात वाईनच्या विक्रीला सरकारनं परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. थोड्याच दिवसात याबाबतची घोषणा केली जाणार आहे. वाईन महागण्याचीही शक्यता आहे. कारण इतके दिवस करमुक्त असणारी वाईन आता मात्र कराच्या कचाट्यात असेल. टाईम्स ऑफ इंडियान याबाबतचं वृत्त दिलंय.
सरकारनं हा निर्णय का घेतला? अलिकडेच सरकारनं विदेशी मद्यावरचं आयातशुल्क कमी केलंय. परिणामी महाराष्ट्रात दारुच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता वाईनबद्दलही मोठा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यानुसार जिथून लोक दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेतात तिथं वाईनची खरेदी करता येणार आहे. म्हणजेच किराणा दुकानं, डिपार्टमेंटल स्टोअर्स (Wine in daily need shops) तसच इतर ठिकाणीही वाईन ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. आतापर्यंत वाईन्स ह्या फक्त दारुच्या दुकानात किंवा बारमध्येच मिळत होत्या. आगामी काळात हे चित्रं बदललेलं असेल. सरकारनं हा निर्णय का घेतला असावा? तर त्याचं उत्तर आहे वाईनमध्ये असलेलं अल्कोहलचं अत्यल्प प्रमाण म्हणजे इतर मद्यांच्या तुलनेत. राज्य सरकारला वाईनच्या माध्यमातून वर्षाला 5 कोटी रुपये टॅक्सच्या माध्यमातून मिळण्याची चिन्हं आहेत. सध्या महाराष्ट्रात वर्षाला 70 लाख लीटर वाईन घेतली जाते. त्यात ह्या नव्या धोरणामुळे 30 लाख लीटरची भर पडेल. म्हणजे वर्षाला 1 कोटी लीटर लोक वाईन्सचा आस्वाद घेतील असा सरकारचा अंदाज आहे.
इतर काय घोषणा आहेत? वाईन्सचं नवं धोरण जास्तीत जास्त विक्री करण्याला प्राधान्य देणारं आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्या दोन बारच्या दरम्यान 200 मीटरचं अंतर हवं अशी अटही आता हटवण्यात येईल. वाईनवर अबकारी कर म्हणून प्रत्येक लीटरला 10 रुपये असा जाहीर करण्यात आलाय. ह्या नव्या टॅक्समुळे मार्केटमध्ये नेमका किती माल आहे, किती घेतला जातोय, किती वाढणार याची आकडेवारी गोळा करायलाही मदत होईल. विशेष म्हणजे बिअर जशी कॅन आणि बॉटलमध्ये मिळते. तशी वाईनही मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या वाईन इंडस्ट्रीसाठी चांगला निर्णय? देशात द्राक्षाचं सर्वाधिक उत्पन्न घेणारे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पहिला आहे नाशिक आणि दुसरा सांगली. याच द्राक्षांच्या जोरावर नाशिकसारख्या ठिकाणी वाईन इंडस्ट्री उदयाला आलीय आणि ती चांगलीच बहरतेय. दारु किंवा बिअर जेवढी ढोसली जाते तेवढा वाईनचा अजून खप नाही. अजून तरी ती थोडं उच्च मध्यमवर्गीय आणि त्यापुढच्या लोकांची पसंत आहे. त्यातच वाईनचे दर हे खूप जास्त आहेत. त्याला कारण तिची क्वालिटी, तिला लागणारा काळ, ब्रँड अशा अनेक गोष्टी आहे. महाराष्ट्रातली ही इंडस्ट्री अजून तरी तरुण अवस्थेतच आहे. नाशिकमध्ये वाईनयार्ड आहेत. पण तिथं जाऊन किंवा घरी, बारमध्येही वाईनची मागणी करणारे तसे मोजकेच ग्राहक आहेत. त्यामुळे सरकारचं नवं धोरण जाहीर झाल्यानंतर यात काही बदल होईल अशी अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा:
Video : दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप
पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या
Video: मुंबई पोलिसांचं दर्यादिली पाहून नेटकरी भारावले, म्हणाले, मुंबई पोलीस बेस्ट आहेत!