अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता? राष्ट्रीय महिला आयोगाच्या निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना सूचना
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आणि निवडणूक आयोगाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महायुतीकडून अरविंद सावंत यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल राज्य महिला आयोग पाठोपाठ आता राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील घेतली आहे. त्यामुळे आता अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं. होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, असं विजया रहाटकर म्हणाल्या आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत. अशा वक्तव्यांवर निवडणूक आयोगानेही कारवाई करावी, असं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. विजया रहाटकर यांनी एक्स (X) वर भूमिका मांडली आहे. विजया रहाटकर यांच्या या भूमिकेमुळे आता अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची जास्त शक्यता आहे.
विजया रहाटकर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या खासदार शायना एन. सी. यांच्याबाबत अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे. दिवाळी सुरु आहे, लक्ष्मीपूजन होत आहे. या पवित्र आनंद पर्वात खासदार सारखे जबाबदार लोकप्रतिनिधी महिलांच्या विरोधात अशाप्रकारचं वक्तव्य करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. शायना एन. सी. यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दाखल घेत कारवाई केली पाहिजे”, असं विजया रहाटकर म्हणाल्या आहेत.
“मी पुन्हा एकदा राजकीय पक्ष आणि जबाबदार लोकप्रतिनिधींना आवाहन करते की, महिलांचा सन्मान करा. महिलांचा सन्मान, गरिमा आणि प्रतिष्ठेसोबत कोणतीही छेडछाड होता कामा नये. महिलांचा सन्मान हा राजकारणापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान सुरु असलेल्या या चुकीच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली पाहिजे”, अशी देखील सूचना केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे.
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांची मविआवर टीका
दरम्यान, अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरुन भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. तसंच महाविकास आघाडीच्या मनात असणारी महिलांविषयीची अपमानकारक भूमिका उघड झाल्याशिवाय राहत नाही. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना “इम्पोर्टेड Xल” म्हणणं हे याच महाविकास आघाडीच्या ‘महिला शक्ती’ला विरोध करण्याच्या भूमिकेतून आलं आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. एका बाजूला लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देऊन त्यांचा सन्मान करणारं आपलं महायुती सरकार तर दुसऱ्या बाजूला समस्त महिला वर्गाचा अपमान करणारी महाविनाश आघाडी आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे. आपल्या आई-बहिणींचा अपमान करणाऱ्या, लाडकी बहीण योजना बंद करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीला जनताच धडा शिकवेल”, अशी टीका रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.