मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी
Maratha Reservation Hearing on Curative Petition in Supreme Court : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी निर्णायक असणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशनवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष..
प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 06 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. तर फक्त दालनात आज केस पुढे चालवायची की नाही याचा आज निर्णय होईल. यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि 3 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत.
विनोद पाटील दिल्लीला रवाना
मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनावणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी विनोद पाटील यांनी आज मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण मिळेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
क्युरेटिव्ह पिटीशन कुणाविरूद्ध?
मराठा आरणक्षासाठीची ही क्युरेटिव्ह पिटीशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री लक्ष्मण पाटील अशी आहे. तसंच मराठा आंदोलक विनोद लक्ष्मण पाटील विरूद्ध जयश्री लक्ष्मण पाटील अशा या दोन क्युरेटिव्ह पिटीशन आहेत. तर न्यायालय आता याबाबत निर्णय घेईल की, जयश्री पाटील किंवा इतरांना नोटीस बजावायची की नाही. बऱ्यातदा क्युरेटिव्ह पिटिशन सुरुवातीच्या टप्प्यातच याचिका फेटाळली जाते. त्यामुळे आज या प्रकरणी काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल.
आजच्या निर्णयाकडे लक्ष
मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातला एक निकाल दिला. न्यायालयाने हे मराठा आरक्षण फेटाळलं. त्यानंतर या संदर्भात रिव्हिव पिटिशन दाखल केली गेली. ती देखील न्यायालयाने फेटाळली. आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी आता ही सुनावणी होते आहे.
मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढा सुरु आहे. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा अधिक तीव्र केला. सरकारला धारेवर धरलं. अशात आता आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.