नवी मुंबई: दिवाळीच्या काळात तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांना घरं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना (Corona Warriros) नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत. कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेत कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत.
या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील करोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये 4488 घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच परिसरांमध्ये ही घरे असतील.
कूण 4488 घरांपैकी 1088 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, ईडब्लूएस आणि उर्वरित 3400 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील आहेत. गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोनाकाळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5,657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा देण्यात आला होता. या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
सर्व मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करुन देणे हा उद्देश ठेऊन गेल्या एक-दीड वर्षात आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली. यामुळे हजारो लोकांना चांगल्या प्रकल्पांमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत.
संबंधित बातम्या:
घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?
स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक