सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं, तटकरेंना गाडायचंय, शरद पवार म्हणाल्याचा दावा; कुणी केला हा दावा?
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच बंड केल्याने शरद पवार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. पक्षातील काही नेत्यांनी फूस लावल्यामुळेच अजितदादांनी हे बंड केल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांनी याबाबत मोठा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गुहागर | 15 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांनी मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. मी भाग्यवान आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचं आहे. सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे, असा खळबळजनक दावा अनंत गिते यांनी केला आहे. गिते यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अनंत गिते हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी गिते यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात राजीनामा देणार आहेत. त्यांचे 16 आमदार अपात्र होतील. निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. आपलेच दिवस परत येणार आहेत, असं अनंत गिते यांनी म्हटलं आहे. गिते यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपला भस्म्या रोग झालाय
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गलिच्छ झालं आहे. एका माणसाच्या हट्टासाठी आमदार फुटले. मी पुन्हा येईन, पुन्हा येईनसाठी नीच राजकारण केलं गेलं. त्याची शिकार ही एकट्या शिवसेनेची नाही. भाजपचे 105 आमदार होते. 40 फोडले, तरीही त्यांची भूक भागेना झालीय. भाजपला भस्म्या रोग झाला आहे. यांना राज्यही हवंय आणि केंद्रही हवंय. आता भाजप घरे फोडायला निघाली आहे, असा हल्लाच गिते यांनी चढवला आहे. राज्याचा कारभार प्रशासन करत आहे. तर सरकारचे काम फक्त आमदार आणि खासदार फोडणं एवढंच सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मरगळ झटकली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. त्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनीही पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे शिंदे यांचीच शिवसेना ही अधिकृत ठरली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे. ठाकरे गट या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र, असं असलं तरी ठाकरे गटाने मरगळ झटकली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: दौरे सुरू केले आहेत. शाखांना भेटी देणं सुरू केलं आहे. ठिकठिकाणी मेळावेही घेतले जात आहेत. शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.