महागाई वाढवून गरिबांना लुटणाऱ्या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करू : नसीम खान
काँग्रेसने नवी मुंबईत सायकल रॅली काढून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. यावेळी आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्यांनीही रॅलीत सहभाग घेतला.
नवी मुंबई : “कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणाऱ्या मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली (Congress Cycle rally in Navi Mumbai against fuel price hike in Maharashtra).
नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आज (8 जुलै) काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. या रॅलीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग व बंदरे मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“मनमोहन सिंगांच्या काळात कच्चा तेलाचे दर अधिक असूनही इंधन दर नियंत्रणात”
नसीम खान म्हणाले, “युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा जास्त असतानाही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले. त्यांनी सामान्य माणसांना महागाईची झळ बसू नये याची खबरदारी घेतली होती. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती 70 डॉलर असतानाही पेट्रोल 106 रुपये लिटर तर डिझेल 96 रुपये लिटर झाले आहे. एलपीजी सिलिंडर 850 रुपये झाले आहे.”
“सामान्य माणसांना सिलिंडर घेणेही कठीण, खाद्यतेल, डाळीच्या किमतीतही भरमसाठ वाढ”
“सामान्य माणसांना सिलिंडर घेणेही कठीण झाले आहे. खाद्यतेल, डाळीच्या किमतीही भरमसाठ वाढलेल्या आहेत. मोदी सरकार या महागाईतून सामान्य जनतेला दिलासा देत नाही. मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचे सरकार आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे आणि यापुढेही संघर्ष करत राहू,” असंही नसीम खान यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
Petrol Diesel Price : मुंबईत पेट्रोलचा उच्चांक, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? जाणून घ्या
इंधन दरवाढ, महागाईमुळे नागरिक त्रस्त, दक्षिण मुंबईत राष्ट्रवादीचे घोषणाबाजी देत आंदोलन
Petrol & Diesel: देशातील ‘या’ प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार; जाणून घ्या राज्यातील इंधनाचा आजचा दर
व्हिडीओ पाहा :
Congress Cycle rally in Navi Mumbai against fuel price hike in Maharashtra