इर्शाळवाडीत प्रचंड ढिगारा हटवण्याचं आव्हान, एनडीआरएफच्या चार टीम दाखल; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू
इर्शाळवाडीत पीडितांना राहण्यासाठी कंटनेर यार्डची सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून ही सुविधा देण्यात आली आहे.
खालापूर | 21 जुलै 2023 : खालापूरच्या इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर गेली आहे. दाट धुके, पाऊस आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात सुविधा येत आहे. कोणतीही गाडी किंवा मशीन डोंगरमाथ्यावर नेता येत नसल्याने कुदळ आणि फावड्यांच्याच सहाय्याने मदतकार्य करावं लागत आहे. त्यामुळे या मदतकार्यात उशीर होत आहे. आज एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. काल रात्री बचावकार्य बंद करण्यात आलं होतं. आज सकाळीच पुन्हा हे मदतकार्य सुरू करण्यात आलं असून राडारोडा हटवण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी तब्बल प्रचंड ढिगारा असल्याने हा ढिगारा हटवण्याचं आव्हान रेस्क्यू टीमसमोर आहे.
काल पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. रात्री अंधार झाल्याने आणि पावसामुळे हे काम थांबवण्यात आलं. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक नागरिक न थकता दिवसभर मातीचा ढिगारा उपसण्याचं काम करत होते. या ठिकाणी जेसीबी मशीन किंवा पोकलेन जाऊ शकत नसल्याने कुदळ, फावडे घेऊनच काम करावं लागलं.
मॅन्युअली काम करण्यात अडचणी येत होत्या. पण जवानांनी प्रयत्नांची पराकष्ठा करत हे काम सुरू ठेवलं. रात्री उशिरा हे काम बंद करण्यात आलं. आज सकाळीच पुन्हा हे काम सुरू झालं. यावेळी एनडीआरएफच्या आणखी चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कामाला वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
30 कंटेनर तैनात
इर्शाळवाडीत पीडितांना राहण्यासाठी कंटनेर यार्डची सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून ही सुविधा देण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या 30 कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे, अशा लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची या कंटेनरमध्ये सुविधा करण्यात आल्याचे रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर कोतुडे यांनी सांगितलं.
पशुधन वाचवण्याचा प्रयत्न
इर्शाळवाडीत पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. या पशुधनाची पशुसंवर्धन विभाग काळजी घेणार आहे. त्यासाठी या विभागाची दोन पथके इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाचे एक सहाय्यक आयुक्त, दोन पशुधन विकास अधिकारी घटनास्थळी झाले आहेत. या पथकामार्फत 11 शेळ्या आणि 11 गायींवर उपचार करण्यात येत आहेत. तीन बैल आणि एक शेळी मृत आढळून आली आहे.
आजही जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, आज सकाळपासूनच इर्शाळवाडीत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आजही या संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, आता या पावसातचजवांनाना ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घ्यावा लागणार आहे.