कोणत्या मागणीवर आरक्षणाचं घोडं आडलंय; सरकार आणि जरांगे यांच्यात आज काय घडलं?
मराठा आरक्षणाचा आजही निर्णय झाला नाही. एका मुद्द्यावर घोडं आडलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. सह्याही झाल्या आहेत. पण अध्यादेशच काढला नाही. त्यामुळे अध्यादेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार अध्यादेश जारी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आजही संपुष्टात आलेलं नाही. सरकारने सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र महत्त्वाची मागणी मान्य केली. पण त्याचा अध्यादेशच काढला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आजचा मुक्काम वाशीमध्येच ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो मराठा आंदोलक आज वाशीतच राहणार आहेत. सरकारचा अध्यादेश आल्यावर तो वाचल्यानंतरच माघारी जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाची आज चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाने मागण्या मान्य झाल्याची कागदपत्रे मनोज जरांगे यांना दिली. मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाशी झालेली चर्चा आणि कागदपत्रातील सरकारची आश्वासने याची माहिती मराठा समाजाला दिली. सरकारने सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं आहे. पण सग्यासोयऱ्यांना सर्टिफिकेट काढण्याचा अध्यादेश काढला नाही. सरकारने उद्या सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा अध्यादेश काढला पाहिजे. तुम्ही अध्यादेश दिला तरी आम्ही तो बारकाईने वाचू आणि नंतर निर्णय घेऊ. अध्यादेश दिला तरी आम्ही आझाद मैदानात येणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. मला डेटा पाहिजे. अध्यादेश हवा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तर उपोषण सोडणार नाही
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सामान्य प्रशासनाचं एक पत्रकही वाचून दाखवलं. सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केली आहे, असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं. एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही? काही करा. रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्री इथेच काढतो. आम्ही 26 जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे जे निर्णय घेतले. आदेश काढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडतो. अभ्यास करतो रात्रभर. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
इथे यायची हौस नाही
सग्यासोयरा या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहू शकत नाही. राहिला तर तुम्ही माझ्याकडे या. पुन्हा ताकदीनं आंदोलन उभं करेन. पण एकही मराठा वंचित ठेवणार नाही. या 54 लाख नोंदीचा डेटा हवा. सग्यासोऱ्याचा आदेशच काढला नाही. चिवटेंना विनंती आहे. तुम्ही प्रयत्न केला. आम्ही त्यासाठीच इथे आलो. आम्हाला इथे यायची हौस नाही. आम्ही कष्टकरी लोक आहोत. आमची इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्रीच हा अध्यादेश द्यावा, असंही त्यांनी म्हटलंय.
सरकार आणि जरांगेमध्ये काय घडलं?
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांना शासन निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे आणि सरकारचे प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्याशी आरक्षणावर चर्चा केली. शासन निर्णयाची माहिती दिली. तसेच मागण्या मान्य झाल्याच्या लेखी आश्वासनाची कागदपत्रेही दिली. तसेच मनोज जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.