ठिक आहे, राजीनामा घ्या सर; महेश जाधव आणि अमित ठाकरे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
मनसे नेते महेश जाधव यांची पक्षातील पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून वाजल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. टीव्ही9 मराठी या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. कामगाराची बाजू लावून धरल्याने मारहाण झाल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर मनसेचे दोन गट आमनेसामने आले आहेत.
नवी मुंबई | 9 जानेवारी 2024 : मनसे नेते महेश जाधव आज माथाडी कामगारांसोबत राजगडावर गेले होते. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा दावा करण्यता येत आहे. अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. त्यांच्यासोबतच्या माथाडी कामगारांनीही ही मारहाण झाल्याचा दावा केला आहे. मनसे कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याचा दावा या कामगारांनी केला आहे. त्यानंतर नवी मुंबईतील मनसेच्या दोन गटात तुफान राडा झाला. मनसेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.
काय आहे कथित संभाषण?
महेश जाधव – साहेब, जय महाराष्ट्र
अमित ठाकरे– बोला
महेश जाधव – साहेब. ते ताराचंद बद्दलचा जो विषय आहे ना… त्यामध्ये 30 वर्ष जुनी आपली युनियन आहे.
अमित ठाकरे – तुम्ही आहात कुठे? राजगडला या ना.
जाधव – नाही. मी बाहेर आहे. कर्जतला. तिथून मी पोहोचू शकत नाही. 2 ते 2.30 ते 3 वाजेपर्यंत येऊ शकतो. ते सांगायचं..
ठाकरे – कर्जतवरनं…
जाधव – कर्जतच्या पुढे आहे मी. आतमध्ये गावात. तिथून यायला… मला घरी यावं लागेल. घरून चेंज करून मग मुंबईला यावं लागेल. मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून. आणि आता बरोबर 12 ला…
ठाकरे – अडीच तासानंतर या.
जाधव – मी दोन वाजेपर्यंत येतो. फक्त शॉर्टमध्ये सांगतो सर, 30 वर्ष जुनी.
ठाकरे – आता 10 वाजले. दोन अडीच तासात पोहोचा. 2 वाजेपर्यंत का येतो. उगाच तुम्ही वेळ नका काढू यात.
जाधव – ओके. विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही.
ठाकरे – विषय मी ऐकला. मला मनोज सर बोलले.
जाधव – जी सर. सर, 30 वर्षाची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युनियन आपल्याकडे आली आहे.
ठाकरे – मला विषय कळलेला आहे. तुम्ही आता 12.30 वाजेपर्यंत पोहोचा. राजगडला.
जाधव – सर, 12.30 वाजता लेबर कमिशनरकडे त्याच विषयाची मिटिंग लागली आहे.
ठाकरे – आज कॅन्सल करा
जाधव – नाही करता येत सर तसं. लेबर कमिशनकडनं मिटिंग कॅन्सल.
ठाकरे – मला घरणं सांगितलं, हा विषय आता… पुढची तारीख घ्या आणि आता राजगडला पोहोचा तुम्ही.
जाधव – सर, मी पहिलं मिटिंग करेन. नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन. सर. कारण ती…
ठाकरे – नाही तर मग तुम्ही राजीनामा घेऊन जा. तुम्हाला एक सांगितलेलं कळत नसेल तर…
जाधव – ठिक आहे सर, राजीनामा देतो मग.
ठाकरे – हां. ठिक आहे.
जाधव – घेऊन ठेवा. राजीनामा घ्या सर.