उद्या मनसेचा एकमेव आमदारही पक्षावर दावा करू शकतो, थेट प्रश्न; राज ठाकरे काय म्हणाले?
लतादीदींवर पुस्तक काढत आहे. 28 सप्टेंबरला त्यांची जयंती असते. त्यावेळी त्यांचं पुस्तक प्रकाशन करण्याचं आमचं सुरू आहे. त्यांची भाची रचना शाह आणि अंबरीश मिश्रा या प्रकल्पात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पनवेल : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणातच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. उद्या मनसेचा एकमेवर आमदारही पक्षावर दावा करू शकतो? असं कसं चालेल? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं.
पनवेल येथे मनसेच्यावतीने राजभाषा दिनाचं आयोजन केलं आहे. गेल्या चार दिवसापासून हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावर त्यांना थेट कळीचाच प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता उद्या मनसेचा एकमेव आमदारही पक्षावर दावा करू शकतो, असं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही. पण काळ सोकावतोय. 22 तारखेला गुढीपाडव्याला या विषयावर सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्रात जे काही झालं त्यावर बोलणार आहे. मला ट्रेलर, ट्रिझर दाखवायचा नाही. मी शेवटचाच सिनेमा दाखवणार आहे, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
राजकारणाचा चिखल झाला
राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही तरीही मुलाखतकाराने त्यांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनीच मुलाखतकर्त्याची फिरकी घेतली. तुमचे आवडते वकील जेठमलानी आहेत का? जेठमलानी एकच प्रश्न सात आठ प्रकारे विचारायचे, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधी नव्हता. सर्व गोष्टी आमनेसामने असायच्या. त्या दिवशी विधानभवनात गेलो होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होतं. त्यावेळी सर्व खाली बसलेले होते. कोण कुठल्या पक्षाचा आहे हेच कळत नव्हतं, असं ते म्हणाले.
मग कळेल, आमचं काय जळतं
राजू पाटील यांना विचारणार आहे. पक्ष ताब्यात घेता का म्हणून. मग कळेल आमचं काय जळतं ते. दिवसरात्र आम्ही बरनॉल लावून बसत असतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
वर्तमानपत्र काढायचे की नाही बघू
लतादीदींवर पुस्तक काढत आहे. 28 सप्टेंबरला त्यांची जयंती असते. त्यावेळी त्यांचं पुस्तक प्रकाशन करण्याचं आमचं सुरू आहे. त्यांची भाची रचना शाह आणि अंबरीश मिश्रा या प्रकल्पात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच दैनिकासाठी मराठा नावाचे हक्क मागायला गेला होतो. पण मिळाले नाही. मी वर्तमानपत्र वाचत नाही. त्यामुळे वर्तमानपत्र काढायचे की नाही ते बघू. सध्या तरी विचार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वाचल्यावर विचारांचा तोकडेपणा येत नाही
नियतकालिकं बंद पडत आहेत. बाहेरच्या राज्यात मात्र नियतकालिकं सुरू आहेत. याला काय कारण आहे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. याला कारण बदलता काळ नाही. मराठी माणसांनी वाचन वाढवलं पाहिजे. वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं जगवली पाहिजे. या माध्यमात काम करणाऱ्यांनीही त्या प्रकारचा खुराक दिला पाहिजे.
आजकाल सर्व गोष्टी मोबाईलवर आहेत. मोबाईल युरोपमध्येही आहे. पण त्यांचं वाचन थांबलं नाही. आपल्या लोकांनी वाचलं पाहिजे. तुम्ही खूप वाचा. वाचल्यावर विचारांचा तोकडेपणा येत नाही. मुलांसोबत चर्चा करताना तुमच्याकडे शब्दांचा खुराक पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.