उर्फी जावेद आणि चित्रा वाघ प्रकरणात शर्मिला ठाकरे यांची उडी?; म्हणाल्या, मी…
शर्मिला ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांना या वादात रस नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, उर्फी प्रकरणावर मनसेकडूनही फारशी प्रतिक्रिया आलेली नाही.
पनवेल : मॉडेल उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यावरून मोठा वाद सुरू आहे. उर्फीने सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उर्फीने काहीही करावं, पण सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालू नये असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. नंतर हे प्रकरण महिला आयोगाकडेही पोहोचलं आहे. तिथून हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आहे. पोलिसांनी उर्फीचा जबाब नोंदवला आहे. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या काल एका कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उर्फी जावेदवर विचारलेल्या प्रश्नावर हटके उत्तर दिलं. मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. शर्मिला ठाकरे यांनी याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.
शर्मिला ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांना या वादात रस नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, उर्फी प्रकरणावर मनसेकडूनही फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे मनसे या वादाला महत्त्व देत नसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल या प्रकरणावर भाष्य केलं होतं. संविधानाने सर्वांनाच अधिकार दिले आहेत. पण उर्फीने अंगात पूर्ण कपडे घातले पाहिजे. रस्त्यावर उघडं नागडं फिरणं, सार्वजनिक ठिकाणी चाळे करणं चालणार नाही. तुझ्या स्टुडिओत आणि घरात काय करायचे ते कर पण बाहेर काही करू नकोस. कोणता धर्म सांगतो बाई नागडी नाच? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
तू तुझ्या घरात आणि स्टुडिओत उघडी नागडी राहा ही माझी तक्रार आहे. लोकांसाठी हे राजकारण असेल पण माझ्यासाठी हा संस्कृतीचा प्रश्न आहे. मी वकील नाही पण मला कायद्याची तरतूद काय आहे हे माहीत आहे. माझा मेसेज खूप स्ट्राँग आहे.
सरकार सरकारचे काम करेल. पोलीस पोलिसांचे काम करतील. आम्ही आमचं काम करू. नंगा नाच मुंबईत रोखला नाही तर औरंगाबाद येथील चौकात हे नाच होतील, अशी भीती वाघ यांनी व्यक्त केली.
तिचे फॉलोअर्स वाढत असतील तर हा नंगा नाच सहन करायचा का? आमचे मुले मुली भाषण करत नाही का? जोपर्यंत ती कपडे घालत नाही तोपर्यंत हे चालणार. उर्फी सारख्या नंगट लोकांना पक्षात जागा नाही. मी उर्फी उर्फी बोलत नाही. मला प्रश्न विचारले जातात म्हणून बोलतेय, असंही त्या म्हणाल्या.