Navi Mumbai Airport : एक विमानतळ, चार नावांची चर्चा, कोण होते दि बा पाटील?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai airport) नामकरणावरुन राजकारण पेटलं आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील (D B Patil Navi Mumbai) यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. तिकडे बंजारा समाजाने या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantaro Naik) यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वस्तूस्थिती मांडत, नवी मुंबईतील विमानतळ हे स्वतंत्र नसून, ते मुंबई विमानतळाचा (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) विस्तार आहे, त्यामुळे जे नाव मुंबई विमानतळाला आहे, तेच नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव नवी मुंबई विमातळाला असेल, असं म्हटलंय. ( Who is D B Patil where demand of Navi Mumbai international airport to be named di ba patil)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.
कोण आहेत दि. बा. पाटील?
दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे 13 जानेवारी 1926 रोजी झाला. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. नवी मुंबईतील अनेक विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी अनेक नेते आणि कार्यकर्तेही घडवले आहेत.
सिडकोकडून नवी मुंबईची उभारणी केली जात होती. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पण योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिबांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला होता.
दि. बा. पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचलं आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात
दि. बा. पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सरसावलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावात, रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहेत. कोळी बांधवांकडून वाशी खाडीमध्ये होडीवर बॅनरबाजी करण्यात आली.
दि. बा. पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही का?
पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बा. पाटील यांची कारकिर्द राहिली आहे. त्यांनी आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचं कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावं यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी म्हणून नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं, अशी मागणी होत आहे.
संबंधित बातम्या