मुंबईः राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची घेतलेली भूमिका, त्यानंतर मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून सुरू झालेला राजकीय वाद काही केल्या शमायला तयार नाही. या वादात खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांनी उडी घेतली असून, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम आहेत. आता तर मी मुंबईची मुलगी आहे, विदर्भाची सून आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम आहे, असा इशारा त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला दिला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे आज खार इथल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही काम करू नका, असे आवाहन करत नोटीस बजावली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही शिवसेनेविरोधात (Shiv Sena) आक्रमक भूमिका घेतली.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. त्यांनी समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भाजत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच. इथेच वाढले. विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे शिवसैनिक माझे काही करू शकत नाहीत. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील, तर कायदा – सुव्यवस्थेचा भंग करण्याचे काम शिवसैनिक करत आहेत, असा आसूड त्यांनी ओढला.
खासदार राणा म्हणाल्या, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणार आहोत. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार आहोत. तिथे कायदा सुव्यवस्थेचे पालन करू, पोलिसांना सहकार्य करू. बाळासाहेब ठाकरे असते, तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली, तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंद करण्यात येणार होते, तसे पोलिसांना आदेश होते, असा आरोपही त्यांनी केला.
नवनीत राणा म्हणाल्या की, सरकार तुमचे आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचे नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही गोंधळ करणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की तुम्ही येऊ नका, असे आवाहन त्यांनी आपल्या केले. त्याचबरोबर बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासमोर येऊन हनुमान चालिसा वाचतील, असा टोलाही राणा यांनी शिवसैनिकांना लगावलाय.