Navneet Rana | फडणवीसांकडून शिका, राज्य कसं चालवायचं ते, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंवर नवनीत राणांची बोचरी टीका
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे शृड बुद्धीने राजकारण करतायत, त्याविरोधात नवनीत राणांनी टीका केली.
मुंबईः राज्य कसं चालवायचं ते देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शिका, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेना (Uddhav Thackeray) दिलाय. तत्त्व काय असतात हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडे कोणतीही तत्त्व नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावं, असा सल्ला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आपल्याला वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार केली असून महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी दाद न दिल्याने ते आज दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत जाण्यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र यावेळी आपण कोर्टाने बंदी घातलेल्या विषय़ावर काहीही बोललो नाहीत, असा दावादेखील केला.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे शृड बुद्धीने राजकारण करतायत, त्याविरोधात नवनीत राणांनी टीका केली.देवेंद्र फडणवीस यांनीही पाच वर्षे सरकार चालनलंय अशा प्रकारे सुडाचं राजकारण त्यांनी कधीही केलं नाही. त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं.
दिल्लीत तक्रार करणार
उद्धव ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांविरोधात दिल्लीतील नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. गुंडशाही आणि दंगा आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंच्या गुंडानी केला, आमच्या मुंबई आणि अमरावतीच्या दोन्ही घरांवर गुंडे पाठवून दंगल केली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट खड्ड्यात गाढून देऊ, असं म्हटलं त्यावर आम्ही तक्रार केली तेव्हाही काहीच कारवाई झाली नाही. याविरोधात आम्ही दिल्लीत जाणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं. महिलांना कशाप्रकारे वागणूक द्यायची हे उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. याविरोधात गृहमंत्री, प्रधानमंत्री आणि ओम बिर्ला साहेब तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राणांचा जामीन रद्द होणार?
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला होता. त्यात गुन्ह्यासंबंधीच्या मुद्द्यावर माध्यमांशी न बोलण्याची अटही टाकण्यात आली होती. मात्र रविवारपासून रवी राणा आणि नवनीत राणा माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत. याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.