दिल्लीतल्या नेत्यांकडून सेना संपवण्याचा प्रयत्न, नवाब मलिक म्हणतात बाळासाहेब असताना…
भाजपबरोबरच्या युतीमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झालं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबई : काल मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पलटवार केला, त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदुत्वावरून (Hindutva) पुन्हा वाद सुरू झाला आहे. काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर भाजपबरोबरच्या युतीमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झालं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. तेव्हा युती केली पण शिवसेनेच्या जागा वाढत नव्हत्या, आता मात्र महाविकासआघाडी मुळे सेनेची ताकद वाढते आहे, असेही मलिक म्हणाले आहेत. तर बाळासाहेब असतानाच शिवसेना भाजप बरोबर युती तोडायला तयार होती, आता दिल्लीचे नेते सेना संपवायला निघाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला आहे, असेही मलिक म्हणाले आहेत.
बिलं थकल्यामुळे महावितरण अडचणीत
नितीन राऊत यांनी पत्र पाठवलं असेल तर ती वस्तुस्थिती आहे, कारण वीज बिलं थकल्यामुळे महावितरण अडचणीत आहे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. केंद्रच्या निधीतून ही मदत करून महावितरणाला अडचणीतून बाहेर काढावे असा प्रस्ताव होता, कुठल्याही खात्याने अशी वीजबिलाची थकबाकी करू नये, असेही ते म्हणाले आहेत, तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी केबिनेटमध्ये अशी कधी नाराजी व्यक्त केलेली नाही, जर कोणाची नाराजी असेल तर ती दूर करू असे मलिक म्हणाले आहेत.
गोडसेचा सिनेमा बॅन केलाच पाहिजे
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या सिनेमावरून चांगलाच वाद रंगला आहे. Why i killed Gandhi या चित्रपटावरून राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले आहेत. सुरूवातील राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनीच या सिनेमाला कडाडून विरोध केला, आव्हाडांच्या सूरात सूर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिळवल्याचे दिसून आले आणि आता काँग्रेसने हा सिनेमा बॅन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे गोडसेचा सिनेमा बँन केलाच पाहिजे, आम्ही काँग्रेसचे समर्थन करतो, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीतील आणखी काही नेत्यांनी कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र महाविकास आघाडीतीलच काही नेत्यांमध्ये यावरून नाराजी आहे. त्यामुळे या चित्रपटाला विरोध आहे. या चित्रपटामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा बाहेर आली आहे.