सकाळी मलिक म्हणाले 3 जणांना का सोडलं, NCB म्हणते 6 जणांना सोडलं, पहिल्यांदाच कारण सांगितलं
पत्रकार परिषद घेऊन एनसीबीने एकूण तीन नाही तर सहा जणांना पुरावा न मिळाल्यामुळे सोडून दिलं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. एनसीबीच्या या खुलाशानंतर या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. पुरावा न मिळाल्यामुळे त्याच दिवशी तीन जणांना सोडून देण्यात आलं असं एनसीबीने म्हटलंय.
मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीला हाताशी धरून महाराष्ट्र तसेच बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. एनसीबीने 2 ऑक्टोबरला केलेल्या कारवाईमध्ये तीन जणांना का सोडलं ? असा सवाल मलिक यांनी केला आहे. मात्र, मलिक यांचे सर्व आरोप एनसीबीने फेटाळले आहेत. तसेच पत्रकार परिषद घेऊन एनसीबीने एकूण तीन नाही तर सहा जणांना पुरावा न मिळाल्यामुळे सोडून दिलं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. एनसीबीच्या या खुलाशानंतर या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. पुरावा न मिळाल्यामुळे त्याच दिवशी तीन जणांना सोडून देण्यात आलं असं एनसीबीने म्हटलंय.
पुरावा न मिळाल्यामुळे सहा जणांना सोडून दिलं
“त्या दिवशी एकूण 14 लोकांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं. सर्वांना कलम 67 अंतर्गत नोटीस देण्यात आली. नंतर सर्वांची तपासणी केली गेली. तसेच स्टेटमेंट रेकॉर्ड़ केले गेले. ताब्यात घेतलेल्या 14 जणांपैकी आठ जणांना पुरव्याच्या आधारावर अटक करण्यात आलं. तर सहा जाणांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आलं. पंचनामा आम्ही स्पॉटवर करतो. वेगवेगळ्या केसेसमध्ये ड्रग्ज स्पॉट वेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारवाई केली जाते. या सर्व वेगवेगळ्या ठिकाणांवर कारवाई आणि सूत्रसुद्धा वेगळे असतात. हे सर्व कागदपत्रे एक प्रक्रियेचा भाग आहेत. आगामी काळात हे सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर ठेवले जातील,” असे स्पष्टीकरण एनसीबीने दिले.
एनसीबीने सविस्तर माहिती दिली
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली. सध्या आर्यन खान तसेच इतर सात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यांनी आज (9 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केले. एनसीबीने प्रतीक गाभा, आमीर फर्निचरवाला आणि रिषभ सचदेवा यांना सोडून दिलं. या तिघांना का सोडून दिलंस, याचं स्पष्टीकरण एनसीबीने द्यावं, अशी मागणी मलिक यांनी केली होती. त्यांच्या याच आरोपानंतर एनसबीने या प्रकरणाविषयीची वरील माहिती दिली.
नवाब मलिक यांनी काय आरोप केले ?
युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते, असे मलिक म्हणाले.
प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. 1300 लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री 12 तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी 11 लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं, अशी मागणी मलिक यांनी केली होती.
इतर बातम्या :