‘फक्त अजित पवारांनी ठेका घेतलाय का?’, रोहित पवार राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांवर संतापले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या बड्या नेत्यांना खडेबोल सुनावलं आहे. "फक्त अजित पवार यांनीच बोलण्याचा ठेका घेतला आहे का?", असा सवाल रोहित पवार यांनी आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना केला आहे.
मुंबई : आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगल्याच कडक शब्दांत सुनावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच बोलण्याचा ठेका घेतला आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना विचारला आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते का बोलत नाहीत? वाचाळवीरांना का प्रतिक्रिया देत नाहीत? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली उद्विग्नता व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे बडे नेते काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल (5 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली होती. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना आरे-तुरेची भाषा वापरली होती. तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार यांच्यावर खूप टोकाची टीका करत असतात. त्यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असं अजित पवार म्हणाले. मुनगंटीवार यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून अजित पवार वगळता कुणी प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून आमदार रोहित पवार संतापले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सुनावलं. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना फक्त अजित पवार यांनी बोलण्याचा ठेका घेतलाय का? अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना सुनावलं.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
“आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहेत. खालच्या पातळीवर जावून बोलून कदाचित त्यांना पदाची अपेक्षा ते आपल्या नेत्यांकडे करत असावेत. जेव्हा एखाद्या पक्षात, विशेषत: भाजपमधील स्वघोषित नेते खालच्या पातळीवर जावून बोलतात आणि वर बसलेले नेते शांत बसतात तेव्हा अप्रत्यक्षपणे खालच्या राजकारणाला मोठ्या नेत्यांचं पाठबळ असल्याचं दिसतं. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, असं रोहित पवार सुरुवातीला म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपल्याच नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.
‘शरद पवारांनी अनेक मोठे नेते केले, पण…’
“एक महत्त्वाची गोष्ट आहे. शरद पवारांनी अनेक मोठे नेते केले. मोठे नेते केल्यानंतर या नेत्यांनी पदं भूषविली, पण जेव्हा शरद पवारांवर कुणी इतक्या खालच्या स्तरावर जावून बोलतो तेव्हा फक्त कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट बघितल्यानंतर मला सुद्धा खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भूषविली ते नेते या बाततीत काहीच बोलत नाहीत. फक्त अजित पवार या बाबतीत बोलले असं कळतंय. पण बाकीचे सगळे शांत बसले आहेत”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी उद्विग्नता व्यक्त केली.
“मला एकच म्हणायचं आहे, आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांबद्दल जे बोलतील त्यांना उत्तर देऊ. लोकं उत्तर देतील. पण नेते गप्प का बसतात? हे कळत नाही”, असं रोहित पवार म्हणाले.