Ajit pawar | ‘आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो….’ प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया
Ajit pawar | महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सहाजिकच महाराष्ट्रच नाही, देशाच्या राजकारणातील ही एक महत्वाची घडामोड आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज बंड झालं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार आणि पक्षातील प्रमुख नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामध्ये छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि दिलीप वळसे पाटील असे पक्षातील दिग्गज नेते आहेत. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. पफ्रुल पटेल हे तर शरद पवार यांचे सर्वात विश्वासू सहकारी. नुकतीच शरद पवारांनी त्यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर प्रफुल पटेल यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रफुल पटेल यांनी शरद पवारांचा आपण आदर करतो, असं सांगितलं.
ते सन्मानीय आहेत
“पक्षात पवारसाहेबांनी बऱ्याच लोकांना मोठं केल. मी त्यापैकीच एक आहे. माझ्यासाठी ते नेहमीच सन्मानीय आहेत. आमचे नेते पवार साहेब आहेत, ते जे काही बोललो, त्यावर मी काही बोलणार नाही, ते सन्मानीय आहेत आणि कायम राहतील” असं प्रफुल पटेल म्हणाले.
“आम्ही जो काही निर्णय घेतलाय, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलाय. आमचा अधिकृत निर्णय आहे. आमच्यावर ईडीचा दबाव वैगेर काही नाही. या बोलण्याच्या गोष्टी आहेत” असं प्रफुल म्हणाले. ‘त्याबद्दल मी त्यांचा आभारी’
“1991 पासून मी लोकसभा, राज्यसभेचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, शरद पवारांनी मला जे काही दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे” असं पटेल यांनी सांगितलं. “आज जो काही निर्णय झालाय, तो अजित पवारांनी घेतलाय. त्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला” असं प्रफुल पटेल म्हणाले.