खरी शिवसेना कुणाची? अजित पवार नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना खरी राष्ट्रवादी कोणती? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही अजित पवारांनी उत्तर दिलं.
शिवसेना पक्षात फूट पडून आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आता विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडून गेल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली. या घडामोडी घडून आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. असं असलं तरीही खरी शिवसेना कुणाची किंवा खरी राष्ट्रवादी कुणाची? या मुद्यांवर वारंवार दावे-प्रतिदावे केले जातात. सुप्रीम कोर्टातही या प्रकरणावरील याचिका प्रलंबित आहे. असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणती शिवसेना ही खरी शिवसेना आहे? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.
खरी शिवसेना कुणाची?
अजित पवार यांनी आज ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. “खरी शिवसेना कुणाची हे मी काय सांगू शकतो? शिंदे म्हणतात बाळासाहेब आज जिवंत असते तर ते काँग्रेससोबत गेले नसते. त्यांचं म्हणणं २०१९मध्ये जी आघाडी झाली ती व्हायला नको होती, असं शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत आहोत. बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात होते. शिंदे यांची पार्टी आहे. त्यावर आम्ही काय बोलू शकतो? त्यांच्या पक्षाबाबत आम्ही बोलू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आम्ही अडीच वर्ष शिवसेनेसोबत सरकार चालवलं. उद्धव ठाकरे प्रमुख होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोरोनाचं संकट होतं. जगावर संकट होतं. त्यावेळी सर्व त्रस्त होते. सर्वांना व्हॅक्सीन देणं गरजेचं होतं. आम्ही अडीच वर्ष सोबत काम केलं. एकनाथ शिंदे वरिष्ठ मंत्री म्हणून त्यांनीही काम केलं आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.
खरी राष्ट्रवादी कुणाची?
अजित पवार यांना यावेळी खरी राष्ट्रवादी कुणाची? असादेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार मुख्य नेते होते. पण महापालिका निवडणुकीवेळी जिल्हा अध्यक्ष, आमदार, खासदार यांना आम्ही विचारायचो. आमदार, खासदार आणि जिल्हा अध्यक्ष हे आघाडी करायची की नाही याचा निर्णय घ्यायचे. आम्ही त्यांना फ्रि हँड द्यायचो. राजकीय परिस्थिती नुसार, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जायचा”, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.