‘ही लढाई मला अजिबात सुखद वाटत नाही, पण…’, सुनेत्रा पवार प्रचार पत्रकात मनातलं बोलल्या
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचे पत्रक प्रसिद्ध झालं आहे. या पत्रकात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेखही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पत्रकात सुनेत्रा पवार यांनी आपली स्वत:ची भूमिका मांडली आहे.
उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामतीत प्रचाराला सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचे पत्रक प्रसिद्ध झालं आहे. या पत्रकात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेखही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पत्रकात सुनेत्रा पवार यांनी आपली स्वत:ची भूमिका मांडली आहे. आपण लोकसभा निवडणूक का लढवत आहोत? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काय-काय घडामोडी घडल्या? याबाबत सुनेत्रा पवार यांनी सविस्तर भूमिका या पत्रकात मांडली आहे.
“2014-19 मध्ये पराभवाचं संकट डोक्यावर होतं. तेव्हा अजित पवारांनी भावाचं आणि पक्षाचं कर्तव्य पार पाडलं. पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला, शरद पवारांचा मतदारसंघ तळ हातावरच्या फोडाप्रमाणं जपलाय. भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा अपमान करणारा नव्हता, तर आधीच्या साहेबांच्या धोरणाशी सुसंगत होता. मात्र अखेरच्या क्षणी काही मतभेद झाले आणि आता त्यातून एकाच कुटुंबातील 2 महिला समोरासमोर उभ्या राहिल्या”, असं सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकात म्हटलं आहे.
‘ही लढाई मला अजिबात सुखद वाटत नाही’
“2014 मध्ये शरद पवारांनीच भाजपला पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्याचा आदर आम्ही त्यावेळी केला होता. मात्र नंतर धरसोड भूमिका विश्वासार्हता कमी करणारी होती. त्यामुळे पक्षांतर्गत नेत्यांना काळजी वाटायला लागली. त्यातूनच खदखद निर्माण झाली. शेवटी ही वेळ आली, ही लढाई मला अजिबात सुखद वाटत नाही. मात्र कर्तव्य बजावताना व्यापक हिताचा विचार महत्त्वाचा म्हणून आज मी लोकसभेच्या रिंगणात उभी आहे”, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकात मांडण्यात आली आहे.