Loksabha Election 2024 | जागा वाटपाच्या विषयावर अजित पवार एकदम स्पष्ट बोलले, म्हणाले….
Loksabha Election 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 2 ते 3 जागा मिळतील अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी चित्र स्पष्ट केलं. भुजबळ राष्ट्रवादीतील प्रमुख सहकारी आहेत, त्यांनी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्या हव्या अशी अपेक्षा केली. त्यात काही चुकीच नाहीय.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यावर विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन ते तीन जागा येणार असं बोलल जात होतं. आता स्वत: अजित पवार यांनीच माध्यमांशी बोलून या बद्दलच चित्र स्पष्ट केलय. “मी, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसात एकत्र बसून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ” असं अजित पवार म्हणाले. रामदास कदम यांनी भाजपाने केसाने गळा कापू नये अशी टीका केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, “तुम्ही मला माझ्या पक्षाबद्दल विचारा. इतरांच्या पक्षातील विषयांवर बोलायला मी बांधील नाही”
“एनडीएमध्ये आहोत, सर्व घटक पक्षांनी परस्परांचा आदर, मान ठेवला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे” अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. तुम्हाला किती जागा हव्या? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “आम्ही ज्यावेळेस चर्चेला बसू, तेव्हा किती जागा हव्या त्यावर दावा सांगू. भुजबळ राष्ट्रवादीतील प्रमुख सहकारी आहेत, त्यांनी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्या हव्या अशी अपेक्षा केली. त्यात काही चुकीच नाहीय”
भंडारा-गोदिंयाबद्दल काय म्हणाले अजित पवार?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, घड्याळ आमच चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल” असं अजित पवार म्हणाले. तुम्ही भंडारा-गोदिंया मतदार संघावर दावा केलाय, त्यावर अजित पवार म्हणाले की, “दावा कोणीही करु शकतो. शेवटची एनडीए ठरवेल, कोणाला कुठली जागा द्यायची” नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायचय. त्यासाठी जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं.
कुठल्या विषयावर सुनील शेळकेंशी बोलणार?
आज लोणावळ्यात शरद पवार यांचा कार्यक्रम झाला. या मेळाव्याला जाऊ नये म्हणून आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप झाला. स्वत: शरद पवार यांनी भाषणातून सुनील शेळके यांना इशारा दिला. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘मी या बद्दल सुनीलशी चर्चा करेन’