NCP | अजित पवार गटाच्या गंभीर आरोपांना शरद पवार गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर, नेमका युक्तिवाद काय?
केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना शरद पवार यांच्या वकिलांकडून युक्तिवादातून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं.

नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जोरदार युक्तिवाद केला. अजित पवार यांच्या गटाच्या युक्तिवादादरम्यान शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शरद पवार हे घर चालवतात तसा पक्ष चालवत होते. त्यांनी सर्व नियम पायदळी तुडवले. पक्षात लोकशाही नव्हती. पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात नव्हत्या. केवळ एका सहीवर पक्षात नियुक्त्या केल्या जात होत्या. या नियुक्त्या कायद्याला धरुन नव्हत्या, असा आरोप अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवादादरम्यान करण्यात आला.
अजित पवार गटाने यावेळी शरद पवार यांच्याच नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला. “शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही निवडणूक पद्धतीने झालेली नव्हती. त्यामुळे त्यांची निवड ही बेकायदेशीर होती. निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का?”, असा सवाल अजित पवार गटाने युक्तावादादरम्यान केला. “शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार यांची नियुक्ती कायदेशीर आहे. तर शरद पवार गटाची निवड बेकायदेशीर आहे”, असा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाने केला.
आम्ही दीड लाखापेक्षा जास्त प्रतित्रापत्र सादर केली आहेत. सर्व कागदपत्रे हे खरी आहेत. तुम्ही या कागदपत्रांची पडताळणीदेखील करु शकतात. या प्रतिज्ञापत्रांमध्ये आमदार आणि खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचादेखील समावेश आहे. आमच्याकडे 53 पैकी 42 आमदार आहे. आमच्याकडे विधीमंडळातील बहुमत आहे. त्यामुळे याचा विचार व्हायला हवा, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. अजित पवार गटाकडून यावेळी अनेक दाखले देण्यात आले. यामध्ये शिवसेना फुटीचा, काँग्रेस फुटीचा, सादिक अली प्रकरणांचा समावेश आहे.
शरद पवार गटाच्या वकिलांचा हस्तक्षेप
अजित पवार गटाच्या वकिलांकडून आज जोरदार युक्तिवाद सुरु होता. यावेळी शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हस्तक्षेप करत युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवार गटाकडून बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा करण्यात आलाय. याच मुद्द्यावर शरद पवार गटाने बोट ठेवलं. बहुसंख्य आमदार कोण आहेत ते दाखवा, असं शरद पवार गटाचे वकील म्हणाले.
शरद पवार गटाचा युक्तिवाद काय?
अजित पवार गटात कोण-कोण आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. अजित पवारांसोबत गेलेल्या सदस्य आणि आमदारांचा आकडा एकदा तपासावा, असा युक्तिवाद शरद पवार गटाने यावेळी केला. यावेळी शरद पवारांच्या वकीलांनी अजित पवार गटाच्या आरोपांनाही उत्तर दिलं. शरद पवारांकडून परस्पर नियुक्ती केली जात होती. पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात नव्हत्या, असा आरोप करण्यात आला. त्यावर शरद पवारांच्या वकिलांनी पक्षांतर्गत निवडीवेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता, असा मुद्दा मांडला.
यावेळी शरद पवार गटाने आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला. या मुद्द्याबाबत शरद पवार नेहमी बोलत असतात. अजित पवार गटाचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पक्षाचा निर्णय नाही. तेच वकिलांनी आज निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी सांगितलं. आमदार जाणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तरीही बहुसंख्य लोक आमच्यासोबत आहेत. पक्षात कुठेही फूट पडलेली नाही. फक्त एक गट पक्षातून बाहेर गेलाय, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला दिलासा देण्यात आलाय. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करा, असं निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाने शरद पवार गटाला याआधी 4 वेळा संधी देण्यात आलीय. त्यामुळे आणखी संधी देऊ नका, अशी विनंती करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने अजित पवार गटाची विनंती फेटाळत शरद पवार गटाला दिलासा दिलाय.