‘झोमॅटो बॉय, सेल्समॅन, हाऊस वाईफ अशी पदं राष्ट्रवादीत नाहीत’, शरद पवार गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी अजित पवार गटाचा सर्व युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांबाबत धक्कादायक माहिती निवडणूक आयोगाला दिली. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. याबाबत आता अजित पवार गटाच्या वकिलांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी युक्तिवाद केला होता. त्यांच्या युक्तिवादानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. यावेळी अभिषेक मनु सिंघनी यांनी अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडलेला सर्व युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटाकडून मांडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये अनेक प्रतिज्ञापत्रे खोटे असल्याचा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून मांडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये काय-काय पदे लिहिण्यात आलीय याबबात धक्कादायक दावा सिंघवी यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीच पदं नव्हती अशा पदांचा उल्लेख अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला.
अजित पवार यांच्या गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये अनेक प्रतित्रापत्रे हे मृत्यू झालेल्या पदाधिकाऱ्यांचे आहेत, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. तसेच या प्रतिज्ञापत्रांमध्ये काही प्रतिज्ञापत्र हे चक्क 10, 12 आणि 14 वर्षाच्या मुलांची आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावेळी त्यांनी या मुलांचे आधारकार्ड देखील निवडणूक आयोगात दाखवले. विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रांमध्ये अनेक पदं ही झोमॅटो बॉय, सेल्समॅन, हाऊस वाईफ अशी दाखवण्यात आली आहे. पण अशी कोणतेही पदं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत अशी पदं नाहीत, असा मोठा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
अजित पवार गटाकडून ‘या’ गोष्टीला विरोध
73 वर्षाची व्यक्ती पक्षाचा युवक तालुकाध्यक्ष कसा? असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 10, 12, 14 वर्षाच्या मुलांची आधारकार्ड अभिषेक मनु सिंघवी यांनी दाखवली. ही लोक पक्षाचे प्रतिनिधी कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सिंघवी यांनी जवळपास 24 कॅटेगरी या युक्तिवाद दरम्यान मांडल्या. त्याला अजित पवार यांच्या गटाकडून वकील मुकुल रोहोतगी यांनी विरोध केला. त्यावर अभिषेक मनु सिंघवी यांनी आम्ही तुम्हाला दिलेले मुद्दे पाहिले नाही का? त्यात आमची चूक आहे का? असा सवाल उपस्थित केला.
सुनावणी संपल्यानंतर अभिषेक मनुसिंघवी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मांडलेल्या युक्तिवादावर भाष्य केलं. “याचिकाकर्त्यांनी जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी आम्ही 20 हजार असे प्रतिज्ञापत्र शोधून काढले आहेत, त्यापैकी 8900 प्रतिज्ञापत्रांचा चार्ट बनवून निवडणूक आयोगाला दिला. अनेक प्रतिज्ञापपत्रे ही खोटी, बनावट आहेत. मृत्यू झालेल्यांचे देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांचेदेखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. तर काही प्रतिज्ञापत्रांमध्ये जे पदं लिहिण्यात आले आहेत ती पदं कधी पक्षातच नव्हते. काही प्रतिज्ञापत्रांमध्ये गृहिणी म्हणून असा उल्लेख आहे. आम्ही अशा 24 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांची यादी केली आहे. हे सर्व खोटी प्रतिज्ञापत्र आहेत”, अशी प्रतिक्रिया मनु सिंघवी यांनी दिली.
अजित पवार गटाचं उत्तर काय?
अभिषेक मनु सिंघवी यांच्या आरोपांवर अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “आमच्याकडून अडीच लाखापेक्षा जास्त शपथपत्र दाखल झाली होती. तेव्हा पळवाटा शोधण्यासाठी अतिशय अल्प अशा शपथपत्रावर काही त्रुटी आहेत ,अशा पध्दतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. “खरंतर आज मेरीटवर युक्तीवाद होण्याची आवश्यकता होती. पण तांत्रिक पद्धतीच्या बाबी उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला”, असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केला.