Sharad Pawar | पडद्यामागे वेगळ्या हालचाली, शरद पवार गट निवडणूक आयोगात उत्तर सादर करणार नाही?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी पाहता आगामी काळात नेमकं काय घडेल? याचा अंदाज लावणं कठीण आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? ते देखील महत्त्वाचं असणार आहे.
नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 30 जूनला सत्तेत सहभागी होण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्या गटाला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षावर दावा सांगण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाला उद्यापर्यंत कागदपत्रे सादर करणं किंवा नोटीसला उत्तर देणं महत्त्वाचं असणार आहे. याचबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार यांचा गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे.
‘त्या’ मेलला निवडणूक आयोगाचं उत्तर नाही
अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल, असा मेल शरद पवार गटाने केला होता. पण त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर शरद पवार गटाने आता पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. पण त्यावरही निवडणूक आयोगाचं उत्तर आलेलं नाही. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उद्यापर्यंत उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.
दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या नोटीसवर अजित पवार गटाकडून काय उत्तर दिलं जातं ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर ज्या घडामोडी घडल्या होत्या, अगदी तशाच घडामोडी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटासोबत घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडींचा आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
‘मला चिन्हाची भीती नाही’
दरम्यान, शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाशी संबंधित प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “निवडणूक आयोगाने मला नोटीस दिली. निवडणूक चिन्हाबाबत मी काही प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत उत्तर देण्यासाठी मला नोटीस दिली. शिवसेनेबाबतीत काही शक्तिशाली लोकांनी ते केले. तोच प्रयोग आमच्याबाबतीत होत आहे, असे वाटते. मी चिन्हाबाबत काही विचार करत नाही. मी 14 निवडणूक चिन्हे काढली. त्यात पाहिली खून बैल, गायवासरू, चरखा, घड्याळ या चिन्हावर मी लढलो. आम्ही चिन्ह बदलून सुद्धा निवडून आलो. त्यामुळे मला चिन्हाची भीती नाही”, असं शरद पवार म्हणाले.