Election Commission Hearing on NCP | शरद पवार यांची पक्षात मनमानी, अजित पवार गटाचा युक्तिवाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोग कार्यालयात दाखल झाले आहेत.

Election Commission Hearing on NCP | शरद पवार यांची पक्षात मनमानी, अजित पवार गटाचा युक्तिवाद
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 7:16 PM

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील दाखल झाले आहेत. शरद पवार या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहिल्याने सध्याच्या घडामोडींना अतिशय जास्त महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे सुनावणी सुरु होण्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतलीय. त्यामुळे आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झालीय. आजच्या सुनावणीत एकाच गटाला भूमिका मांडण्यासाठी वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. 4 ते 6 या दोन तासांच्या वेळेत ही सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस लढलेले वकील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू मांडणार आहेत. वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह हे अजित पवार यांची बाजू मांडतील. तर शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनुसिंघवी हे बाजू मांडतील. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत.

शरद पवारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झालीय. दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनावणी सुरु होण्याआधी मोठं वक्तव्य केलं. आमच्याकडे 53 पैकी 43 आमदार आहेत, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यानंतर आता सुनावणी पार पडत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त यांच्यासमोर ही सुनावणी पार पडत आहे. सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा दाखला देण्यात आलाय. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून पक्षाच्या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे 43 आमदार आणि नागालँडमधील आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचा समावेश आहे.

अजित पवार गटाकडून पहिला युक्तिवाद, ‘जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर’

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केलाय. मनिंदर सिंह हे पक्षाचं कामकाज कसं चालतं, काय सुरुय, काय-काय घडलंय, याबाबत माहिती देण्यात आलीय. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आणि लोकप्रतिनिधींचं संख्याबळ महत्त्वाचं आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केलाय.

पक्ष घटनेचं पालन होत नाही, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केलाय. तसेच केवळ एका सहिने पक्षाची नियुक्ती होत नाही, असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. लोकसभेच्या एक, तर राज्यसभेच्या एका खासदाराचा पाठिंबा देण्यात आल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय. पक्षामध्ये याआधी झालेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. 30 जूनला अजित पवारांची बहुमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असं युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय.

‘शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी’

पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची 30 जूनलाच निवड करण्यात आलीय. याची माहिती निवडणूक आयोगाला 30 जूनलाच देण्यात आल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने केलाय. जयंत पाटील यांच्या निवडीचा घटनाक्रम मांडण्यात आलाय. पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच करण्यात आली होती. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. एकाच सहीवर नियुक्ती केली जाऊ शकत नाही, असा दावा अजित पवार गटाने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय. त्यामुळे आमदारांची संख्या आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. महाराष्ट्रातील 53 आमदारांपैकी 43 आमदार आमच्यासोबत आले आहेत. तसेच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे. तसेच नागालँडचे सर्व सात खासदार आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय.

शरद पवार गटाचा युक्तिवाद काय?

दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अभिषेत मनुसिंघवी यांच्याकडूनही युक्तीवाद करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केलाय. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय.

शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या स्थापनेचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे सादर करण्यात आले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, असं म्हणत शरद पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आलाय. राज्य आणि बाहेर हा पक्ष कुणाचा आहे ते सर्वांना माहिती आहे, असा दावा शरद पवार गटाने केला.

अजित पवार यांच्या गटाची भूमिका ही पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केलाय. अजित पवार यांच्यासह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र पाठवलं आहे, असं शरद पवार गटाच्या वकिलांनी सांगितलंय. तसेच पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही, असा युक्तीवाद शरद पवार गटाने केलाय.

विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे. पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केलाय. 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे, असाही युक्तिवाद करण्यात आलाय. कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आलीय.

अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला

पक्षाचे मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाईचं पत्र पाठवणं बेकायदेशीर आहे, असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं, असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला देण्यात आलाय. त्यानुसार आम्हालाच पक्ष आणि चिन्ह देण्यात यावं, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. विधानसभा, विधान परिषदेतलं संख्याबळ आमच्याकडे अधिक आहे. कोअर कमिटीतील संख्याबळही आमच्याकडे आहे, असा दावा अजित पवार गटाने केलाय.

निवडणूक आयोगाची महत्त्वाची भूमिका

ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे. दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.निवडणूक आयोगाकडून पुढच्या सुनावणीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर करण्यात आली. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी 9 ऑक्टोबरला पार पडेल, असं स्पष्ट करण्यात आलंय.

अजित पवार गटाकडून शिवसेना निकालाचा दाखला

दुसरीकडे अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. निवड आणि निवडणुका घेऊन झालेली नेमणूक यामध्ये फरक आहे, असा दावा अजित पवार गटाने केलीय. अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निर्णयाचा दाखला देण्यात आलाय. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जास्त संख्याबळ होतं. त्यामुळे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं. तसंच आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात यावं, अशी मागणी अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्रात केली गेलीय.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.