‘मी या भानगडीत पडत नाही’, ठाकरे-आंबेडकर युतीवर शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान
शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडीची (Bahujan Vikas Aghadi) युती होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण या युतीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिलीय.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडीची (Bahujan Vikas Aghadi) युती होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आलीय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिलाय. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली तर ताकद वाढेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनीदेखील युतीबाबत दुमत नाही, असं वक्तव्य केलंय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज वेगळीच प्रतिक्रिया दिलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आंबेडकर आणि ठाकरेंच्या युतीवर दुग्धशर्करा योग असल्याचं म्हटलंय.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्रित आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचं आवाहन केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
संबंधित कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपण पुढच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून ठाकरे आणि आंबेडकर युतीवर चर्चा होतेय. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून याआधी सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आलीय. असं असताना आज शरद पवारांनी वेगळीच भूमिका मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत मला माहिती नाही. मी या भानगडीतच पडत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण बघत असाल महाराष्ट्रात जेवढ्या घडामोडी घडत आहेत ते पाहता जेवढी ताकद वाढवता येईल ते महत्त्वाचं ठरेल”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“युतीबाबत बोलणं सुरु आहे हे मी निश्चितच सांगेन. त्यांचं फायनल झालं की त्याबाबत जाहीर करु”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
संजय राऊत नेमकं म्हणाले?
“उद्या शिवसेना प्रमुख त्याविषयी जाहीर करतील’, असं संजय राऊत म्हणाले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतलाच तर तो दुग्धशर्करा योग असेल. प्रकाश आंबेडकरांनी समविचारी पक्षासोबत जातोय, असं म्हटलं तरी ते खूप ताकदीचं असेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.