निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद, म्हणाले….
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार आज माध्यमांसमोर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना माजी पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरु यांच्यावर टीका केली. त्यावर शरद पवारांनी मत मांडलं. “पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. जवारलाल नेहरु यांनी देशाला प्रजासत्ताकच्या दिशेला नेलं. देशाचा चेहरा बदलण्यसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञानात नेहरुंनी चांगलं काम केलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांचा दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणातील जे संवाद होते त्यामध्ये जवारलाल नेहरु यांच्यावर टीका होती. ते ऐकून दु:ख झालं. हे बरोबर नाही. ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाहीत. मग ते जवाहरलाल नेहरु असतील, लाल बहादुर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील त्यांनी देशासाठी अमूल्य असं योगदान दिलं आहे. पंतप्रधानांचं आजचं भाषण ऐकून दु:ख झालं. नेहरुचं योगदान नाकारता येणार नाही”, असं मत शरद पवारांनी मांडलं.
‘अहिंसेने उत्तर द्यावं लागेल’
यावेळी एका विद्यार्थ्याने महत्त्वाचा प्रश्न विचारला. काही तरुण चुकीच्या गोष्टींच्या विरोधात येतात तेव्हा त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा काय करावं? असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला. त्यावर शरद पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली. “जे तरुण आपलं मत मांडायला पुढे येतात, संघर्ष करायला पुढे येतात त्याच्यावर वैयक्तिक हल्ला केला जातो. याची सुरुवात दिल्ली विद्यापीठातून सुरु होते. आता हा प्रकार फक्त दिल्ली विद्यापीठापर्यंत मर्यादीत राहिलेला नाही. इतर विद्यापीठांमध्येही हा प्रकार घडायला लागला आहे. सांप्रदायिक शक्ती वाढत आहे. त्यांच्या विरोधात संघटन उभं करावं लागेल. अहिंसेने उत्तर द्यावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.
‘सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय’
“जे सुरू आहे ते अतिशय वाईट सुरु आहे. झारखंडमधील मुख्यमंत्री जे एक वेगळी भूमिका घेत होते. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. असहिष्णुता आहे. आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.