म्हणून मला सुरक्षा दिली असावी … झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवार काय म्हणाले ?
शरद पवारांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशातील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना ही सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयावरच शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
म्हणून मला सुरक्षा दिली असावी…
झेड प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी गुरूवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ‘ मला काही माहिती नाही, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 3 लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती तीन लोकं म्हणजे मी, आरएसएस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहीत नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते ‘ अशी प्रतिक्रिया झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी दिली.
यासंदर्भात पण गृहमंत्रालयातील जबाबदार व्यक्तीशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी बोलून माहिती मिळाली की पुढे काय निर्णय घ्यायचा, काय करायचं ते ठरवणार असंही त्यांनी नमूद केलं.
शरद पवारांना सुरक्षा पुरवल्यावर निलेश राणेंची टीका
शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय झाल्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत टीका केली होती. त्यांच्या पोस्टची बरीच चर्चाही झाली.
शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे??
बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?? असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.