पुणे, दि.26 जानेवारी 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली. कारण कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती. त्या प्रकरणात मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्यामुळे चर्चा सुरु झाली. या प्रकरणात आता अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी स्वत:च्या मुलास फटकारले आहे, असे अजिबात घडता काम नये, याबाबत मी पार्थशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
पार्थ आणि गजा मारणे यांची भेट म्हणजे अत्यंत चुकीची घटना आहे. मी त्याच्याबद्दल माहिती घेत आहे. पार्थसोबत जे कार्यकर्ते गेले, ते त्याला तिथे घेऊन गेले. असा प्रकार अजिबात घडता कामा नये. पार्थशी माझी भेट झाल्यावर त्याला मी सांगणार आहे. माझ्याकडून एकदा अशी घटना घडली होती. पण जेव्हा मला कळले त्यादिवशी त्या व्यक्तीला पक्षातून काढले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.
गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तो मारणे टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती. या खून प्रकरणात तो तीन वर्ष येरवडा कारगृहात होता. पार्थ पवार गजा मारणे याला भेटले तेव्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी म्हणजे त्यांनी इव्हेंट केल्याचा प्रकार आहे. माझी पण एसीबी चौकशी झाली होती. पाच तास ही चौकशी झाली होती. आयकर विभागाचे लोकही आले होते. पण आम्ही कधी इव्हेंट केला नाही. लोक जमा केली नाही. कोणी काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. तसेच कोणी काय आरोप करायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. चौकशीसाठी ज्याला आदेश येतात त्याला चौकशीला बोलावले जाते. त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात.