Chhagan Bujbal: पक्षश्रेष्ठींनी आपला कसा कसा अपमान केला ते भुजबळांनी A टू Z सांगितलं, पाहा काय-काय म्हणाले?
"मी रोखठोकच बोलतो. जोपर्यंत जीवाच जीव आहे, अन्याय होईल तोपर्यंत संघर्ष सुरु राहील. लासलगाव-येवला माझा मतदारसंघ आहेत. माझे मतदार आहेत. त्यांच्याशी मी बोलेन. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलेन आणि नंतर ठरवेन काय करायचं", असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर ते अस्वस्थ झाले आहेत. भुजबळ बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून आपल्याला काय-काय पक्षादेश देण्यात आले आणि काय-काय घडलं? याबाबत सविस्तर A टू Z माहितीच भुजबळांनी जाहीर केली आहे. छगन भुजबळ यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते. “मी लोकसभेला उभा राहत नव्हतो. मला सांगितलं की उभे राहा. मी नाशिकला एक महिना खूप तयारी केली. मी तयार झालो. त्यांनी असं सांगितलं की, आता मी नक्की जिंकणार. त्यावेळेला सुद्धा ऐन वेळेला ह्यांनी चुप्पी साधली. दोन दिवस प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि सुनील तटकरे मला सांगायचे की, अमित शाह-मोदींचा निरोप आहे, तुम्हाला उभं राहावं लागेल. उभं राहायचं ठरवलं तर नाव जाहीर करत नव्हते. एक महिना झाला तरी नाव जाहीर केलं नाही त्यामुळे मी माघार घेतली, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
“मग पुढे राज्यसभेच्या दोन जागा निघाल्या. एक सुनेत्रा ताई पवार यांना दिलं. ठिक आहे. दुसरं कुणाला दिलं? तर वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना दिलं. का दिलं तर म्हणे, मी सभेत सांगितलं होतं की, तुला खासदार करेन आणि आता तू माघार घे म्हणून. ही काय पद्धत आहे? मी गेलो तर पक्षाला फायदा होईल. समजून घ्या, असं मी सागूंनही त्यांनी त्यावेळेला राज्यसभा दिली नाही. म्हणायचे की, तुम्ही विधानसभेला उभं राहिलं पाहिजे, त्यामुळे पक्ष चांगला मजबुतीने उभा राहील. त्यामुळे निवडणुकीला उभा राहिलो”, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.
‘मी तुमच्या हातातलं खेळणं आहे?’
“जरांगे यांच्यासोबत वाद झाला. माझं मताधिक्य घटलं. अगदी काँटे की टक्कर झाली. आता ते म्हणायला लागले, जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही राजीनामा द्या आणि राज्यसभेत जा. आम्ही नितीन पाटील यांचा राजीनामा घेतो. नितीन पाटील यांचा राजीनामा का घ्यायचा आहे? कारण त्यांच्या भावाला मकरंद पाटील यांना मंत्री करायचं आहे. आणखी नाशिकच्या कुणाला मंत्री करायचं असेल, यासाठी तुम्ही मला लहान पोरासारखं खेळवता, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे? सांगतो द्या तर देत नाही. ज्यावेळेला संधी येते तेव्हा राजीनामा द्या म्हणतात. कारण एडजस्टमेंट करायची आहे”, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली.
भुजबळांचं सूचक वक्तव्य
“काही मानसन्मान आहे की नाही? जिथे मानसन्मान नाही तिथे तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काही नाही. मी रोखठोकच बोलतो. जोपर्यंत जीवाच जीव आहे, अन्याय होईल तोपर्यंत संघर्ष सुरु राहील. लासलगाव-येवला माझा मतदारसंघ आहेत. माझे मतदार आहेत. त्यांच्याशी मी बोलेन. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलेन आणि नंतर ठरवेन काय करायचं. सर्वांना विचारून निर्णय घेईन. पण एक आहे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.