महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच, अजित पवारांनी किती जागा मागितल्या? भुजबळांनी थेट आकडाच सांगितला
महायुतीच्या गोटातली महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत किती जागा मागितल्या? याबाबत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासाठी सातत्याने बैठका पार पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुणे विमानतळावर आज महायुतीच्या दोन बड्या नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. भाजपला या निवडणुकीत 125 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढायची आहे, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील 100 जागांवर निवडणूक लढायची चर्चा आहे. असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागांवर निवडणूक लढवायची आहे, अजित पवार गटाने किती जागांची मागणी महायुतीत केली आहे? या प्रश्नाचं उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे. छगन भुजबळ यांनी यावेळी थेट आकडाच सांगितला आहे.
“अजित पवार यांनी सुद्धा महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्या आहेत”, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महायुतीचं जागावाटप बऱ्यापैकी ठरलं असल्याची प्रतिक्रिया दिली. “70 ते 80 टक्के जागांवर महायुतीचं एकमत झालं आहे. महाविकास आघाडीआधी महायुतीचं जागावाटप झालेलं असेल”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“आमचे जे कारभारी आहेत, अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे चर्चा करत असतात. मी त्या चर्चेत जास्त लक्ष घालत नाही. त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांनी मला वाटतं 80 ते 90 जागा मागितल्या होत्या. त्यावर किती निकालात आहेत याची मला कल्पना नाही”, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“मला वाटतं आता फार वेळ लागेल असं नाही. आमचं 70 ते 80 टक्के जागांवर एकमत झालेलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील. तुम्हाला नक्तीच महाविकास आघाडीपूर्वी महायुतीच्या जागावाटप झालेल्या दिसतील”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.