Ajit Pawar | आमदारांना निधी वाटपात दुजाभाव झाल्याच्या आरोपांवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar | आमदारांना समन्यायी निधी वाटप झालं नसल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर करण्यात येतोय. त्यावर अजित पवार यांनी TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
– निवृत्ती बाबर
मुंबई : आमदारांना निधी देताना राजकारण झाल्याचा आरोप होत आहे. अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी पेक्षा जास्त निधी दिलाय. शिंदे गटाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न झालाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आमदारांना निधी वाटपात राजकारण झाल्याचा आरोप होत असताना, आता त्यावर खुद्द राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी घुमजाव करून अजित पवार यांना पाठिंबा दिला. सरोज अहिरे यांच्या मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी दिला.
जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी सुद्धा भरभरुन निधी
शरद पवार यांच्यासोबत असलेले जयंत पाटील अजित पवार यांच्यावर टीका करतात. पण निधी वाटपात अजित पवार यांनी हात आखडता घेतला नाही. त्यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी भरभरून निधी दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना भरभरुन निधी
शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघासाठी भरभरुन निधी दिलाय. मंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले नाराज होते. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय.
अजित पवार काय म्हणाले?
“निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समसमान निधी वाटप झालय” अशी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरोधक आरोप करतायत, पण त्यात तथ्य नाहीय’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता यावर विरोधक काय बोलतात? हे महत्वाच आहे. भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मोठा निधी दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसच्या आमदारांसोबत निधी वाटपात दुजा भाव झाल्याचा आरोप होतोय.