एकनाथ खडसे अजूनही राष्ट्रवादीत, पण भाजप कार्यालयात जाऊन घेतली प्रचाराची सूत्र
eknath khadse on bjp: एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. माझा भाजप पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे आपण प्रचारात उतरल्याचे खडसेंनी यावेळी सांगितले.
कधी काळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यांनी स्वत: आपण पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही. एकीकडे सध्या लोकसभा निवडणूक प्रचार सुरु आहे. त्यांची सून रक्षा खडसे भाजपची उमेदवार आहे तर त्यांच्या सध्याच्या पक्षात श्रीराम पाटील उमेदवार आहेत. या सर्व परिस्थितीत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कार्यालयात जाण्याऐवजी भाजप कार्यालयात बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहे.
यावल भाजप कार्यालयातून प्रचार
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही. पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जावून बसले. त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांना प्रचाराबाबत सूचनाही केल्या. बैठकाही घेतल्या. पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकांमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहे.
खडसे म्हणतात, केवळ औपचारिकताच बाकी
दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. माझा भाजप पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे आपण प्रचारात उतरल्याचे खडसेंनी यावेळी सांगितले. दुसरीकडे खडसे यांचा भाजप प्रवेश अद्याप प्रलंबित आहे. त्याआधी खडसे हे भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहे.
मला कामाला लागण्याचे सांगितले…
माझा प्रवेश केव्हा होईल, त्याची तारीख कधी? भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मी म्हटले माझ्या प्रवेशासंदर्भातली भूमिका तुम्ही केव्हा जाहीर करणार? असे विचारले. यासंदर्भात भाजप नेते विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला सांगितले आहे. तुमचा भाजप प्रवेश निश्चित आहे. प्रवेशासंदर्भातील तारीख आम्ही तुम्हाला कळवू. तोपर्यंत तुम्ही कामाला लागा. त्यांनी मला सांगितल्यामुळे मी भाजपचे काम सुरु केले आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो आहे.