राजकारणात ट्विस्ट! शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये शरद आणि अजित पवार यांच्या पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील तसंच मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात कदाचित ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण तशी वक्तव्ये आता समोर येऊ लागले आहेत. अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपूरला जावून विठुरायांचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य समोर आलं आहे. “जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत”, असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. “शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येणे चांगली गोष्ट आहे”, असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आलं तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले. त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनजंय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. “बीड प्रकरण अत्यंत दुःखदायी असून गंभीर आहे. जे झालं त्यामुळे सगळेच नाराज आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडू नये यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यात कुणालाही सोडणार नाही”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.