हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बडा नेता शरद पवार गटात जाणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा बॉम्ब फुटणार आहे. कारण अजित पवार गटातील दोन मोठे नेते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा समावेश आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला धक्क्यावर धक्के बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंगला सुरुवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार हे भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेत आहेत. शरद पवार यांनी आतापर्यंत अनेत मतदारसंघांमध्ये भाजप आणि अजित पवार गटाला खिंडार पाडलं आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच इंदापूरमधील भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यानंतर अजित पवार गटातील आणखी दोन बडे नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे लागोपाठ दोन दिवसांत दोन मोठ्या नेत्यांचे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार 14 तारखेला फलटण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर येत्या 15 तारखेला शरद पवार हे दौंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी रमेश थोरात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रामराजे निंबाळकर शरद पवार गटात का जात आहेत?
रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांचादेखील विरोध होता. माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, अशी रामराजे यांची मागणी होती. पण ते शक्य होऊ शकलं नाही. यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे यांचा विरोध होता.
विशेष म्हणजे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्यावेळच्या बैठकांमध्ये रामराजेदेखील असायचे. पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत ते जिंकूनही आले. दरम्यानच्या काळात रामराजे यांनी रणजितसिंह नाईक यांच्या उमेदवारीवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच नुकत्याच गेल्या महिन्यात फलटणला पार पडलेल्या अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत रामराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जाणार नाही, यासाठी आपण महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या दरम्यान रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्याने रंगत होती. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.