Rohit Pawar : विधान परिषदेवर जाताच राम शिंदेंनी करून दाखवलं, रोहित पवारांना धक्का; शिंदेंनी जिंकल्या तीन ग्रामपंचायती
Rohit Pawar : वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे. या शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सोलापूर जिल्ह्यात विजयी सलामी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथे मुख्यमंत्री शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
नगर: राज्यातील 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (gram panchayt election) निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जे निकाल हाती आले आहेत. त्यात शिवसेना (shivsena), शिंदे गट आणि भाजपचीच (bjp) घोडदौड सुरू असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही अपेक्षित जागा मिळालेल्या नाहीत. उलट राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. रोहीत पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्या ताब्यात आल्या आहेत. विधान परिषदेवर निवडून येताच राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड पंचायत समितीत परिवर्तन घडवत करून दाखवलं आहे. कर्जत जामखेड पंचायत समितीचा निकाल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होताच ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांना धक्का बसला आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत राम शिंदे गटाकडे आल्या आहेत, तसा दावा राम शिंदे यांनी केला आहे. भाजपचे कोरेगावमध्ये 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 आणि कुळधरणमध्ये (बिनविरोध)13 पैकी 7 सदस्य विजयी झाले आहेत.
सोलापुरात शिंदे गट आणि भाजपच
सोलापुरातील बार्शी तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत गटाचा झेंडा फडकला आहे. बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची सरशी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा दोन्ही ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे. पानगाव ग्रामपंचायतीमध्ये राऊत गटाचे 17 पैकी 11 उमेदवार विजयी झाले आहेत. तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे. या शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सोलापूर जिल्ह्यात विजयी सलामी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथे मुख्यमंत्री शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
नाशिकच्या देवळात भाजपच
राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात देवळा तालुक्यातील 13 ठिकाणचे निकाल जाहीर झाल्यानंतर देवळा येथे भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आल्याने देवळा येथे जल्लोष करण्यात आला. विकास कामांच्या जोरावर भाजपला यश मिळाले असल्याचा दावा भाजपचे नाशिक जिल्हा कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब पगार यांनी केला आहे.
साताऱ्यात शिंदे गटाचे वर्चस्व
सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत शिंदे गटाने जिंकली. उतर तांबवे ग्रामपंचायतीत शंभुराज देसाई यांचे पॅनेल विजयी झाले आहे. कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत 22 वर्षा नंतर सत्तांतर झाले आहे. कराड कोयना वसाहत ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 10 जागा जिंकून भाजपाच्या अतुल भोसले यांना सता कायम ठेवण्यात यश आले आहे. येथे महाविकास आघाडीचा एकही जागा मिळाली नाही. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.