Sharad Pawar : राष्ट्रवादीकडे त्या वेळी मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार नव्हता, शरद पवार यांची धक्कादायक कबुली
Sharad Pawar: मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी फरक केला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. त्या मतदानाच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना १९९९ मध्ये केली. त्याच्या पाच वर्षानंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता, असा आरोप अजित पवार सातत्याने करत आहे. अजित पवार यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी मुलाखतीत उत्तर दिले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार काय उत्तर देणार? हे आता पाहावे लागणार आहे.
छगन भुजबळांना पद दिले असते तर पक्ष फुटला असता
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती. परंतु शरद पवार यांनी मंत्रीपद जास्त घेऊ आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेवर अजित पवार आता टीका करत आहेत. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. २००४ मध्ये पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सुप्रिया अन् अजित यांच्यात भेद नाही
मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी फरक केला नाही.
प्रफुल्ल पटेल भाजपकडे जाण्याची तेव्हापासून इच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. प्रफुल्ल पटेल २००४ पासून भाजपकडे जाण्याचा आग्रह करत होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.