ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार का? शरद पवार यांची EXCLUSIVE मुलाखत
"मला ५६ वर्ष झाली. पक्षाचं काम करावं, संसदेत लोकांमधून डायरेक्ट निवडून येणं हा जसा मार्ग आहे, तसा दुसरा मार्ग आहे. त्यानुसार काम करू शकतो. मी राज्यसभेतच आहे. त्यासाठी मला डायरेक्ट निवडणूक लढवावी लागली नाही. रिटार्यमेंट कुठे. पण निवडणुकीला उभं राहायचं नाही", अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारला. “शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे, असं सांगून भावनिक आवाहन करतील”, असं अजित पवार मतदारांना उद्देशून म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याबाबत शरद पवारांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली. आपण 2014 पासून प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहत नसल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी यावेळी दिली.
“दहा वर्षापूर्वी मी सांगितलं की डायरेक्ट निवडणुकीला मी नाही. मी २०१४ पासून निवडणुकीला उभा राहिलो नाही. मी राज्यसभेचा सदस्य आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये निवडणूक लढवणं… १९६७ साली मी पहिली निवडणूक लढवली. मला ५६ वर्ष झाली. पक्षाचं काम करावं, संसदेत लोकांमधून डायरेक्ट निवडून येणं हा जसा मार्ग आहे, तसा दुसरा मार्ग आहे. त्यानुसार काम करू शकतो. मी राज्यसभेतच आहे. त्यासाठी मला डायरेक्ट निवडणूक लढवावी लागली नाही. रिटार्यमेंट कुठे. पण निवडणुकीला उभं राहायचं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
शरद पवारांची अजित पवारांवर टीका
“प्रत्येकाला कुठेही काम करण्याचा अधिकार आहे. त्या भागाचं भलं करायचं असेल. काम करायला कोणी पुढे येत असेल तर तक्रार करायचं काम नाही. पण विचारधारा वेगळी असेल तर… आम्ही कुणाशी संघर्ष करत होतो. त्यांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढले आणि त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले ही फसवणूक आहे. ज्यांच्यासोबत ते लोक गेले त्यांच्याशी आमचं असोसिएशन नाही. कारण आमची आयडॉलॉजी वेगळी आहे. पण बसता कुणासोबत, शक्ती कुणाला देता, त्याचा लाभ कुणाला मिळतो. ज्यांच्यासोबत बसला त्यांना लाभ मिळत आहे. लाभ घेणाऱ्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही”, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली.
यावेळी शरद पवारांना राज्यात सत्तांतर होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “परिवर्तन म्हणजे लोक सत्ताधाऱ्यांना सत्ता देणार नाही. नाराजी तिघांच्या विरोधात आहे. रोष आहे. त्यामुळे लोक परिवर्तन करणार आहेत”, असं शरद पवार म्हणाले.