राजकारणातील मोठी बातमी: बारामतीबाबत अजित पवारांचा निर्णय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मध्यरात्री बैठकांचे सत्र, अखेर…
आपणास निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही. मी सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. माझ्या ऐवजी कोणाला उमेदवारी द्यावी, जय पवार यांना उमेदवारी द्यावी का? हा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. बारामती जय पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली. गुरुवारी मध्यरात्रीच बैठकांचे सत्र सुरु झाले. अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मध्यरात्री दोन बैठका झाल्या. त्यात पक्षाचे बडे नेते सहभागी झाले. त्यानंतर बारामतीमधून अजित पवार हेच निवडणूक लढवणार असल्याचे ठरले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन बैठका, विधानसभेची रणनीती
अजित पवार यांनी गुरुवारी म्हटले होते की, आपणास निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही. मी सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. माझ्या ऐवजी कोणाला उमेदवारी द्यावी, जय पवार यांना उमेदवारी द्यावी का? हा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेणार आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या रात्री दोन वाजेपर्यंत बैठक चालल्या.
हे नेते होते उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. पहिली बैठक रात्री १०.३० ते १ पर्यंत चालली. या बैठकीत धनंजय मुंडे, रामराजे निबांळकर, शिवाजीराव गर्जे, नवाब मलिक सहभागी झाले होते. नवाब मलिक बैठकीत आल्यामुळे ते अजित पवार यांच्या गटासोबतच असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसरी बैठक रात्री १.३० वाजता झाली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत बारामती विधानसभेच्या जागेवर चर्चा झाली. त्यात अजित पवारच उमेदवार असणार आहे, असा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीनंतर ‘टीव्ही ९ मराठी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनिती ठरली असल्याचे सांगितले. जागा वाटपबाबत किंवा राष्ट्रवादी किती जागा लढवणार यासंदर्भात चर्चा झाली का? या प्रश्नावर तटकरे यांनी नकारार्थी उत्तर दिले.