Narhari Zirwal | राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ 24 आमदारांना घेऊन राज्यपालांच्या भेटीला
Narhari Zirwal | विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांची भेट घेण्यामागे कारण काय?. मागच्यावर्षी राजकारणात अचानक एकाएकी त्यांना महत्व प्राप्त झालं. नरहरी झिरवळ सर्वांच्या नजरेत भरले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. नरहरी झिरवाळ राज्यपालांच्या भेटीला गेले, त्यावेळी 24 आमदार त्यांच्यासोबत होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नरहरी झिरवळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आदिवासी विकास सोसायटीच्या प्रश्नावरुन नरहरी झिरवळ यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. आदिवासी समाजासाठी हा महत्वाचा विषय आहे.
नरहरी झिरवळ राज्यपालांच्या भेटीला गेले, त्यावेळी 24 आमदार त्यांच्यासोबत होते. नरहरी झिरवळ हे नाव राज्याच्या राजकारणात सर्वप्रथम मागच्यावर्षी चर्चेत आलं.
त्यावेळी अचानक झिरवाळ यांच्यावर जबाबदारी आली
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं. त्यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात ही राजकीय भूकंप झाला, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळे उपाध्यक्ष या नात्याने जबाबदारी त्यांच्यावर आली.
आता हे प्रकरण विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे
नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस बजावली होती. झिरवाळ यांच्या नोटीसवरुन सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद रंगला. सर्वोच्च न्यायालयाने आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं आहे.
झिरवळ अचानक नजरेत का भरले?
या सर्व राजकीय घडामोडींमुळे नरहरी झिरवळ यांना मागच्यावर्षी राजकारणात अचानक एकाएकी महत्व प्राप्त झालं. नरहरी झिरवळ सर्वांच्या नजरेत भरले, ते त्यांच्या साधी राहणीमान आणि मितभाषी स्वभावामुळे. नरहरी झिरवळ कुठल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात?
नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आदिवासी समाजाचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत आहेत.